इंदापूर: वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. या शहरीकरणाला आळा घालून खेड्यांचा, गावांचा विकास केला तर पर्यावरणाचा समतोल राखता येईल. असे प्रतिपादन अहिल्यानगर येथील ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ प्रा . बी. एन. शिंदे यांनी केले. अ. भा. मराठा महासंघ भिगवण संचलित छत्रपती सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शिवजयंती निमित्त आयोजित राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी ‘मानवाचे भवितव्य’ या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते.
व्याख्यानमालेचे उद्घाटन महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेचे माजी अध्यक्ष व श्री. संत ज्ञानेश्वर विश्वस्त समिती आळंदीचे प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप यांचे हस्ते व भिगवण ग्रामपंचायतीचे उपसरपंच सत्यवान भोसले यांचे अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक १४ फेब्रुवारी रोजी भिगवण येथील एस के कलेक्शन च्या भव्य आवारात संपन्न झाले. प्रथम दिवसाचे प्रायोजक भिगवण येथील श्रीनाथ पतसंस्थेचे चेअरमन पराग जाधव, डॉ . जयप्रकाश खरड,बारामती येथील श्री श्रेयश इंडस्ट्रीजचे युवा उद्योजक विष्णू काळे, बारामती हॉस्पिटलचे प्रतिनिधी डॉ. अजय थोरात आणि भिगवण येथील वैभव जोशी हे यावेळी उपस्थित होते.
श्री. शिंदे पुढे म्हणाले की, आध्यात्मिक वारसा हा भारताचा संपन्न वारसा आहे. त्याद्वारे पंचमहाभूत या संकल्पनेतून माणसाची आध्यात्मिक व मानसिक उन्नती साधून भारत देश हा विश्वगुरू होऊ शकतो. सध्याच्या दूषित पर्यावरणामुळे माणसाचे मानसिक अध:पतन झाले असून योग-प्राणायाम, व्यायाम व पौष्टिक आहार यातून उन्नती होऊन माणसाचे भवितव्य सुरक्षित राहू शकते. असेही मत त्यांनी व्यक्त केले. जगाच्या तुलनेत भारतीय भूमी झाडांकरिता उपयुक्त आहे, परंतु तसा प्रयत्न केला जात नाही. शासनाचे वतीने कोट्यावधी झाडे लावली गेली. परंतु त्याचे संगोपन व संवर्धनाकडे दुर्लक्ष होत आहे.याकरिता ५० टक्के झाडांची शेती हे धोरण राबविणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.दीप प्रज्वलन व वर्षभरात मृत झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विचार मंचावरील मान्यवरांच्या हस्ते प्रायोजकांचा तर मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महासंघाच्या भिगवण शाखेचे अध्यक्ष डॉ. संकेत मोरे यांनी केले. सूत्रसंचालन सुहास गलांडे, परिचय वाचन संजय चौधरी व आभार प्रदर्शन पांडुरंग वाघ यांनी केले.
© The Indian Express (P) Ltd