पुणे : हडपसर पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. सागर दिलीप पोमण (वय ३४) असे लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. पोमण हडपसर पोलीस ठाण्यात नियुक्तीस आहेत. तक्रारदाराने हडपसर पोलीस ठाण्यात आर्थिक व्यवहारात फसवणूक झाल्याबाबतचा तक्रार अर्ज दिला होता. संबंधित अर्जाची चौकशी पोलीस उपनिरीक्षक पोमण यांच्याकडून करण्यात येत होती. फसवणूक प्रकरणातील पैसे परत मिळवून देतो, असे पोमण यांनी तक्रारदारास सांगून ५० हजार रुपयांची लाच मागितली होती.

हेही वाचा : Uddhav Thackeray vs Eknath Shinde: १ ऑगस्टला पुढील सुनावणी, परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

त्यानंतर तक्रारदाराने ‘एसीबी’कडे तक्रार नोंदविली. तक्रारीची शहानिशा करून सापळा लावण्यात आला. तक्रारदाराकडून ५० हजारांची लाच घेणाऱ्या पोमण यांना ताब्यात घेण्यात आले. पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अतिरिक्त अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे तपास करत आहेत.