मुंबईच्या तुलनेत पुणे विभागात कारवाईचे प्रमाण जास्त

लाचखोरीची प्रकरणे उघडकीस आणण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पुणे विभागाने आघाडी घेतली आहे. एसीबीच्या पुणे विभागाकडून मे अखेरीपर्यंत ७९ सापळे लावून ८१ लाचखोरांना पकडण्यात आले आहे. त्या तुलनेत सर्वाधिक शासकीय कार्यालये असलेल्या एसीबीच्या मुंबई विभागाकडून गेल्या पाच महिन्यांत बारा सापळे लावण्यात आले असून पंधरा लाचखोरांना पकडण्यात आले आहे.

एसीबीच्या पुणे विभागात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या पाच जिल्ह्य़ांचा समावेश होतो. राज्यभरात एसीबीचे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नांदेड असे आठ विभाग आहे. यंदाच्या वर्षी लाचखोरीची प्रकरणे उजेडात आणण्यात पुणे विभागाने आघाडी घेतली आहे. सर्वाधिक शासकीय कार्यालये असलेल्या मुंबई विभागात लाचखोरांना पकडण्याचे प्रमाण तसे कमी आहे. पुण्याखालोखाल एसीबीच्या नाशिक विभागाकडून ४९ सापळे लावण्यात आले आहेत. गेल्या पाच महिन्यांच्या आकडेवारीचे अवलोकन केल्यास एसीबीच्या अन्य विभागाच्या तुलनेत पुणे विभागाची कामगिरी सरस ठरली आहे.

एसीबीच्या पुणे विभागाकडून राज्यात सर्वाधिक लाचखोरीची प्रकरणे उघडकीस आणण्यात आली आहेत. सरकारी कर्मचाऱ्याकडून लाच मागितली गेल्यास तक्रार दिली जात नव्हती. एसीबीच्या पुणे विभागाकडून गेल्या काही वर्षांपासून व्यापक प्रमाणावर जनजागृती मोहीम राबविण्यात आली. विविध शासकीय कार्यालयांमध्ये फलक लावण्यात आले. लाच मागितल्यास एसीबीकडे तक्रार करा, असे फलक शासकीय कार्यालयांमध्ये लावण्यात आले. विविध परिसरात जनजागृती करणारी पत्रके एसीबीकडून वाटण्यात आली. त्यामुळे पुणे विभागात लाचखोर कर्मचाऱ्याविरुद्ध तक्रार देण्यास तक्रारदार पुढे येत आहेत. लाचखोरीच्या प्रकरणात तक्रारदाराने तक्रार दिल्यानंतर पुढील कारवाई करता येते. तक्रारीशिवाय कारवाई करणे शक्य होत नाही, असे निरीक्षण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना नोंदविले.

गेल्या काही महिन्यांपासून विविध रेडिओ वाहिन्यांच्या माध्यमातून एसीबीच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सामान्य व्यक्तीपर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यपद्धतीची माहिती प्रभावीपणे पोहोचली जात आहे. जनजागृती मोहिमेमुळे अन्य विभागांच्या तुलनेत पुणे विभागात लाचखोरीच्या प्रकरणात तक्रार देण्याचे प्रमाण चांगले आहे, असे पोलीस अधीक्षक दिवाण यांनी सांगितले.