पुणे : उच्चभ्रू सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून नऊ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज चोरून पसार झालेल्या चोरट्याला काळेपडळ पोलिसांनी गजाआड केले. चोरट्याकडून नऊ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. कोंढवा-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावरील एका उच्चभ्रू सोसायटीत ही घटना नुकतीच घडली होती.
मुस्तफा शकील अन्सारी (वय ४१, रा. कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. पिसोळी भागातील एका सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने लांबविले होते. या प्रकरणाचा काळेपडळ पोलिसांकडून तपास करण्यात येत होता.
सदनिकेतील गॅलरीत रक्ताचे डाग आढळले होते. त्यानंतर पोलिसांनी न्याय वैद्यक प्रयाेगशाळेतील तज्ज्ञांना घटनास्थळी बोलावून घेतले होते. रक्ताचे नमुने पोलिसांनी जमा केले होते. हे नमुने तपासणीसाठी न्याय वैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. पोलिसांनी सोसायटीच्या परिसरासह ७२ ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासले होते.
पोलीस कर्मचारी लक्ष्मण काळे, विशाल ठोंबरे, नितीन ढोले, महादेव शिंदे हे गस्त घालत होते. त्या वेळी पिसोळी भागातील सोसायटीत घरफोडी करुन पसार झालेला चोरटा कोंढवा परिसरात थांबल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा लावून पकडले. त्याच्याकडून सोन्याचे दागिने, दुचाकी, मोबाइल संच असा ९ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायकआयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक अमर काळंगे, सहायक निरीक्षक अमित शेटे, हवालदार प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, शाहीद शेख, अतुल पंधरकर, सद्दाम तांबोळी आणि पथकाने ही कामगिरी केली.
शहरात भरदिवसा सदनिकेचे कुलूप तोडून दागिने लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरटे सोसायटीतील बंद सदनिकांची पाहणी करुन घरफोडी करतात. ज्या सोसायटीत रखवालदार, तसेच सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, अशा सोसायटीत शिरुन चोरटे घरफोडीचे गुन्हे करत असल्याचे दिसून आले आहे.
वाघोली, बिबवेवाडी भागात घरफोडीच्या घटनांमध्ये चोरट्यांनी १५ लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना नुकतीच घडली. घरफोडीचे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण विचारात घेता गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण कमी आहे.