पुणे : कर्ज मिळवून देण्याबरोबरच नोकरी लावतो असे सांगत मित्राचे कागदपत्रे घेत त्याआधारे घेतलेले सिमकार्ड नीलेश घायवळ टोळीतील एका सदस्याने काही गुन्ह्यांत वापरले असल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्व प्रकार उघडकीस आल्याने तरुणाने वारजे पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार नीलेश घायवळ टोळीतील सदस्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमोल दत्तात्रेय लाखे (रा. धाराशिव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सदस्याचे नाव आहे. याबाबत सुरेश जालिंदर डेंगळे (वय ३२, रा. पारा, ता. वाशी, जि. धाराशिव) यांनी फिर्याद दिली आहे. कुख्यात गुंड नीलेश घायवळ आणि त्याच्या टोळीवर दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने डेंगळे यांना वारजे माळवाडी पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते.

पोलिसांना चौकशीत समजले की, डेंगळे यांच्या नावावर असलेला मोबाईल क्रमांक लाखे वापरत आहे. लाखे याने डेंगळे यांच्या कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड घेतले आहे. तो नंबर काही बँक खात्यांशी संलग्न करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि लाखे मित्र आहेत. २०१९ मध्ये लाखे याने फिर्यादी यांना ‘मी तुला शेती आणि व्यवसायासाठी कर्ज काढून देतो. पुण्यात माझ्या ओळखी आहेत. तू कागदपत्रे घेऊन ये. तुझ्या नोकरीबद्दल मी माझा मित्र नीलेश घायवळ याला बोललो आहे. ते देखील तुला सांगतो,’ असे सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी त्यांची कागदपत्रे लाखे याला दिले. लाखे याने डेंगळे यांच्या कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड घेऊन ते काही गुन्ह्यांत वापरले आहे.

……