पुणे : फलक (फ्लेक्स) लावताना विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी दोघांविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.
देवाराम नथाराम घांची (वय १७) असे मृत्युुमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील नथाराम सुजाराम घांची (वय ४०, रा. उत्तर केसर मिल नाका, ठाणे, मूळ रा. पाली, राजस्थान) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी तेजाराम उर्फ अजय माली, हरिश परिहार यांच्याविरुद्धगुन्हा दाखल करण्यात आला आहे. मांजरीतील तुलसी टेक्सटाईल्स दुकानाजवळ १८ फेबु्रवारी २०२४ रोजी ही घटना घडली.

हे ही वाचा…अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे नदीपात्रात अडकलेले दोघे बचावले; भिडे पूल, कर्वेनगर परिसरातील घटना

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, देवाराम घांची हा आरोपी तेजाराम माली याच्या मांजरी येथील डायमंड प्रिंटिग येथे फ्लेक्स तयार करण्याचे काम करत होता. १८ फेब्रुवारी रोजी देवाराम त्याचा सहकारी इंद्रनाथ रावल याच्यासोबत तुलसी टेक्सटाईल दुकानात फलक लावण्यासाठी गेला होता. तुलसी टेक्सटाईल दुकानावरुन उच्चदाबाची वीजवाहिनी गेली होती. आरोपींनी त्याला फ्लेक्स लावण्यासाठी पाठविले होती. त्यावेळी उच्च दाबाच्या वाहिनीतून विजेचा धक्का बसल्याने देवाराम गंभीर होरपळला. उपचारादरम्यान त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. देवारामच्या वडिलांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास केला. दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक राेकडे तपास करत आहेत.