पुणे : मोटारीची काच फोडून पाच लाखांची रोकड लंपास करण्यात आल्याची घटना पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी परिसरात घडली. याबाबत एका व्यावसायिकाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक आहेत. ते कुंजीरवाडी परिसरात राहायला आहेत. व्यावसायिक कामानिमित्त त्यांना जर्मनीला जायचे होते. त्यासाठी त्यांनी शुक्रवारी दुपारी सोलापूर रस्त्यावरील एका बँकेतून पाच लाखांची रोकड काढली. रोकड मोटारीत ठेवून ते कुंजीरवाडी परिसरातील एका हाॅटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी आले. त्यांनी मोटार हाॅटेलसमोरील मोकळ्या जागेत लावली होती. चोरट्यांनी मोटारीची काच फोडली.
मोटारीच्या कप्प्यात ठेवलेली पाच लाख रुपयांची रोकड लांबवून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक काळभोर तपास करत आहेत.