पुणे : पुढील पाच दिवस राज्याच्या विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पावसाच्या सरींसह सोसाटय़ाचा वारा आणि काही ठिकाणी गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे. हा अंदाज शनिवार (१८ मार्च) पर्यंत कालावधीसाठी वर्तवण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ासाठी हा अंदाज वर्तवण्यात आला असून त्यापासून प्रतिबंधासाठी सर्वतोपरी तयारीत राहण्याचे आवाहनही हवामानशास्त्र विभागाकडून करण्यात आले आहे. सोसाटय़ाचा वारा, वादळ सदृश परिस्थिती आणि विजांच्या कडकडाटाची परिस्थिती निर्माण झाल्यास बचावासाठी घराबाहेर न पडण्याचा तसेच जलाशय आणि विजेचा धक्का बसण्याचा धोका असलेल्या ठिकाणांपासून दूर राहा, असेही हवामान विभागाकडून सुचवण्यात आले आहे. विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वीज पुरवठाही बंद ठेवण्याबाबतची सूचना भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आली आहे. द्राक्ष आणि केळय़ांच्या पिकांना आडोसे देण्याची तसेच कोणत्याही पिकांना सिंचन किंवा रासायनिक खतांची फवारणी न करण्याची सूचना हवामान विभागाकडून शेतकऱ्यांसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मंगळवारी (१४ मार्च) मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये तुरळक पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या दैनंदिन अहवालातून समोर आले आहे. कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत वाढलेले, तर उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळ राहिल्याचे दिसून आले. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ३८.८ अंश सेल्सिअस ब्रह्मपुरी येथे तर सर्वात कमी किमान तापमान १६.८ अंश सेल्सिअस पुण्यात नोंदवण्यात आले आहे. १४ ते १८ मार्च या कालावधीत कोकण-गोवा, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सोसाटय़ाचा वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chance of rain in the state for the next five days meteorology department ysh