पुणे : ‘राज्यातील ११ हजार १५० ग्रंथालयांच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी संगणकीय प्रणालीद्वारे ग्रंथांचे अद्ययावतीकरण करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. ग्रंथालयांचे अनुदान वाढवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. तसेच खासदार आणि आमदार निधीतून काही पुस्तक खरेदी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत,’ अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ग्रंथालयांना दिल्या जाणाऱ्या अर्थसाह्याच्या विविध योजनांच्या माहितीपुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले.उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, शासकीय विभागीय ग्रंथालय पुणे यांच्या तर्फे राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानाच्या अर्थसाह्य योजनांविषयी माहिती देण्यासाठी आयोजित विभागस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

सोमवार पेठेतील श्री संत गाडगेमहाराज अकुल धर्मशाळा येथे झालेल्या कार्यक्रमावेळी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, कोलकाता येथील राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानाचे महासंचालक प्रा. अजय प्रतापसिंह, प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर या वेळी उपस्थित होते.

मुंबईतील सांताक्रुझ येथे राज्याचे शिखर ग्रंथालय राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाची अतिशय देखणी इमारत तयार होत आहे. या ग्रंथालयातही वाचकांना पुस्तके ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे पाटील यांनी सांगितले.

पाटील म्हणाले, ‘जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या निधीच्या माध्यमातून ग्रंथालये अद्ययावत करण्यात येणार आहेत. राज्यातील शासकीय आणि सार्वजनिक ग्रंथालयांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न आहे. समाजमाध्यमांच्या युगात वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी शासन विविध उपक्रम राबवत आहे. शासकीय आणि खासगी ग्रंथालयांचे डिजिटायझेशन करून वाचकांना पुस्तके ऑनलाइन उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant patil information about attempts to purchase books from mp and mla funds pune print news ssb