पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त, सहायक आयुक्त व क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या विभाग आणि जबाबदारीत बदल करण्यात आले आहेत. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांच्याकडे निवडणूक व जनगणना विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी हे बदल केले आहेत.
आयुक्त शेखर सिंह यांचा महापालिकेतील तीन वर्षांचा कालावधी दीड महिन्यापूर्वीच पूर्ण झाला आहे. मात्र, कालावधी संपूनही त्यांची बदली झालेली नाही. आता महापालिका निवडणुकीनंतरच बदली हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका कामकाजाच्या दृष्टीने सिंह यांनी प्रशासनात पुन्हा एकदा फेरबदल केले आहेत. निवडणूक व जनगणना हा विभाग अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्याकडे होता. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विभाग अतिरिक्त आयुक्त जांभळे-पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.
सहायक आयुक्त अमित पंडित यांच्याकडे आरोग्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. त्यांच्याकडे माहिती व तंत्रज्ञान विभागही कायम ठेवण्यात आला आहे. सहायक आयुक्त अश्विनी गायकवाड यांच्याकडील ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी काढून ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. सहायक आयुक्त राजाराम सरगर यांच्याकडील वैद्यकीय मुख्य कार्यालयाच्या जबाबदारीसह ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.
सहायक आयुक्त दशरथ कांबळे यांच्याकडील ‘क’ क्षेत्रीय मुख्यालय काढून झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभाग देण्यात आला आहे. सहायक आयुक्त परशुराम वाघमोडे यांच्याकडे समाज विकास विभागासह आपत्ती व्यवस्थापन व अभिलेख कक्षाची जबाबदारी देण्यात आली आहे. सहायक आयुक्त राजीव घुले यांच्याकडे कर संकलन मुख्य कार्यालयासह स्थानिक संस्था कर (एलबीटी) विभागाचे कामकाज सोपविण्यात आले आहे. सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांच्याकडील अभिलेख कक्षाचा आणि उपायुक्त सीताराम बहुरे यांच्याकडील एलबीटी विभागाचा अतिरिक्त कार्यभार काढला आहे.