लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : चिंचवडमधील थेरगाव येथे बारावर्षीय मुलीचा विवाह झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पती, मुलीचे वडील, भटजीसह दहा जणांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलीच्या २० वर्षीय भावाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मुलीचे वडील, पती, त्याचे वडील, बहीण, दाजी अशा दहा जणांविरोधात बालविवाह प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

आणखी वाचा-जेजुरी भागातल्या नाझरेत बिबट्याची दहशत, शहरी भागात दर्शन झाल्याने नागरिक चिंतेत

तक्रारदार मावळमध्ये राहतात. त्यांना बारा वर्षांची बहीण आहे. तिचे सोलापूर जिल्ह्यातील तरुणासोबत लग्न लावून देण्यात आले. मुलीच्या वडिलांच्या सहमतीने हे लग्न झाले. थेरगाव येथे १५ नोव्हेंबर रोजी हा विवाह सोहळा पार पडला. तक्रारदाराच्या वडिलांनी लग्नाबाबत कोणाला सांगू नको असे धमकाविले होते. घाबरुन तक्रारदाराने कोणालाही काही सांगितले नव्हते. अखेरीस तक्रारदाराने मंगळवारी आईला सांगितले. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली.