पुणे : ‘सध्याच्या मोबाइल आणि एआयच्या काळात मातीशी नाळ तुटणार नाही, यासाठी मुलांना पुस्तकांकडे, वाचनाकडे वळवणे महत्त्वाचे आहे. त्या दृृष्टीने बालपुस्तक जत्रा पुण्यापुरती राहता कामा नये. बालपुस्तक जत्रेचे नावीन्यपूर्ण प्रारूप विभाग, जिल्हा, तालुका पातळीवर नेण्यासाठी शिक्षण विभाग पुढाकार घेईल,’ अशी भूमिका शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मांडली.
राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महापालिका, संवाद पुणे यांच्यातर्फे गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित पुणे बालपुस्तक जत्रा कार्यक्रमात भुसे बोलत होते. राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे, संवाद, पुणेचे सुनील महाजन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठीच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सागर वैद्य, प्रसेनजित फडणवीस आदी या वेळी उपस्थित होते. याच कार्यक्रमात किशोर मासिकाच्या अंकासह ‘साने गुरुजी’, ‘श्यामची आई’ या इंग्रजीत अनुवादित पुस्तकांचे प्रकाशनही भुसे यांच्या हस्ते करण्यात आले.
‘पुणे बालपुस्तक जत्रा या नावीन्यपूर्ण प्रयोगातून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शिकायला मिळाले आहे. शिक्षण विभाग राज्यातील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी काम करत आहे. हसतखेळत शिक्षण, आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. आताच्या काळात चांगली आर्थिक परिस्थिती असलेले पालक मुलांना इंग्रजी, इतर माध्यमांत शिकवतात. दुसरीकडे जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गोरगरिबांची मुले जातात. त्यातून एक प्रकारची दरी निर्माण होत असल्याचे दिसते. मात्र, गोरगरीब मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे,’ असे भुसे म्हणाले.
‘राज्यात पहिली ते बारावीचे दोन कोटी बारा लाख विद्यार्थी, सात लाख शिक्षक, अनेक संस्था आहेत. शिक्षणासारख्या फार मोठ्या क्षेत्रात चांगले काम करण्याचा प्रयत्न आहे. येत्या वर्षभरात सकारात्मक बदल दिसतील,’ असेही त्यांनी नमूद केले.
केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडे मागण्या
‘केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशभर व्यापक पातळीवर शिकवला गेला पाहिजे, ही मागणी त्यांनी लगेचच मान्य करून तत्काळ अंमलबजावणीचे निर्देशही दिले. तसेच अभिजात दर्जा मिळालेली मराठी भाषा इतर माध्यमांत सक्तीने शिकवण्याची मागणी केली. त्यानुसार ‘सीबीएसई’ने महाराष्ट्रात मराठी शिकवण्याचे निर्देश दिले आहेत. आणखीही काही विषयांत केंद्राचे सहकार्य मिळणार आहे,’ असे दादा भुसे यांनी स्पष्ट केले.