लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने (सीआयसीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार बारावीची परीक्षा १२ फेब्रुवारी ते ३ मार्च, तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत होणार आहे. २०२४च्या परीक्षेपासून उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्याची नवी सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, कम्पार्टमेंट परीक्षा रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सीआयसीएसईने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. दहावीच्या परीक्षेत कला विषयाची परीक्षा वगळता अन्य विषयांच्या परीक्षा सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत होणार आहेत. कला विषयाची परीक्षा सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत घेतली जाणार आहे. तर बारावीच्या सर्व विषयांची परीक्षा दुपारी दोन ते सायंकाळी पाच या वेळेत होणार आहे. परीक्षेच्या वेळापत्रकासह परीक्षेबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. परीक्षेचे दिनांकनिहाय वेळापत्रक cisce.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षेचा निकाल मे महिन्यात जाहीर करण्यात येणार आहे.
आणखी वाचा-तळवडे दुर्घटना! ती भेट ठरली शेवटची…
सीआयसीएसईने २०२४च्या परीक्षेपासून कम्पार्टमेंट परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नियमित परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यावर उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी करण्याच्या प्रचलित सुविधेसह पुनर्मूल्यांकन करण्याची नवी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त दोन विषयांसाठी इम्प्रुव्हमेंट परीक्षा देता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.