पुणे : ‘विकास निधी हवा असेल तर मतदान यंत्रावरील बटण कचाकचा दाबा, नाहीतर निधी देताना आपला हात आखडता येईल’ असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर येथे केले होते. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आचारसंहिता भंगची तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या वक्तव्यात कोणताही पक्ष किंवा उमेदवार याचा उल्लेख नसल्याने ही तक्रार बारामतीच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळली.

बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचार करताना पवार यांनी इंदापूर येथील सभेत हे वक्तव्य केले होते. यावर विरोधकांकडून टीका करण्यात आली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडूनही आचारसंहिता भंगची तक्रार दाखल करण्यात आली होती. या सभेला रितसर परवानगी घेण्यात आली होती. तसेच भरारी पथक देखील या ठिकाणी उपस्थित होते. सभेची संपूर्ण चित्रफीत मी पाहिली, त्यात कोणत्याही पक्षाला किंवा उमेदवाराला मत द्या, असे म्हटलेले नाही त्यामुळे ही तक्रार फेटाळण्यात आली आहे, असे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – अमोल कोल्हे यांच्या उमेदवारी विरोधात ‘वंचित’ न्यायालयात जाणार, जाणून घ्या कारण

हेही वाचा – पुणे : गर्दी टाळण्यासाठी रेल्वेचा नवा फंडा! आता प्रवाशांना सीटवरच मोफत पिण्याचं पाणी

दरम्यान, द्विवेदी यांनी हा अहवाल जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्याकडे सुपूर्द केला. इंदापूर येथील सभेत पवार म्हणाले होते, ‘आम्ही केलेल्या कामाचा तुम्हाला योग्यरित्या फायदा होणार आहे. पण जेव्हा तुम्हाला फायदा होईल तेव्हा कोणामुळे फायदा झाला आहे, हे कधीच विसरू नका. विकासकामासाठी लागेल तेवढा निधी आम्ही देणार आहोत. हवा तेवढा मी देतो त्याप्रमाणे मशीनमध्ये देखील कचाकचा बटन दाबा म्हणजे मला निधी द्यायला बरे वाटेल. नाहीतर माझा हात आखडता घेऊ शकतो.’ या वक्तव्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी टीका केली होती.