पुणे: एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहन नेल्यानंतर त्याची स्थानिक प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) नोंदणी करावी लागते. यासाठी आरटीओकडून वाहनाच्या प्रकारानुसार करही आकारला जातो. परंतु, सध्या आरटीओकडून खासगी वाहनांना व्यावसायिक दराने कर आकारणी सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे वाहनचालकांना दुप्पट भुर्दंड बसत आहे.

एका राज्यातील नागरिक कामानिमित्त परराज्यात जातात. दुसऱ्या राज्यात गेल्यानंतर ते आपले वाहन सोबत नेतात. हे वाहन दुचाकी अथवा चारचाकी असले तरी त्याची स्थानिक आरटीओकडे नोंदणी करावी लागतो. या वाहनांना स्थानिक नोंदणी क्रमांक घ्यावा लागतो. त्याचबरोबर यासाठीचा वाहन करही भरावा लागतो. अशा वाहनांची नोंदणी करताना खासगी आणि व्यावसायिक अशी वर्गवारी आहे. खासगी वाहनावरील कराच्या तुलनेत व्यावसायिक कर हा दुप्पट आहे.

कंपन्या तसेच, इतर व्यावसायिक आस्थांपनाच्या नावावर असलेल्या वाहनांना व्यावसायिक कर लागू होतो. वाहनाची मालकी खासगी असल्यास त्यानुसार त्यांना कर आकारला जातो. परंतु, आरटीओत सध्या खासगी वाहनमालकांना व्यावसायिक कर आकारणी सुरू असल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे या वाहनमालकांना कराचा दुप्पट भुर्दंड बसत आहे. वाहन नोंदणी करताना आकारण्यात आलेला हा कर कमी करण्यासाठी त्यांना आरटीओमध्ये हेलपाटे मारावे लागत आहेत. हेलपाटे मारूनही त्यांचा कर लगेच कमी केला जात नसल्याचेही चित्र आहे.

वाहन नोंदणी करताना आरटीओकडे वाहनाची कागदपत्रे सादर केली जातात. त्यात वाहन खासगी अथवा व्यावसायिक असल्याचा उल्लेख असतो. तरीही खासगी वाहनमालकांना व्यावसायिक कर आकारणी कशी केली जाते, असा प्रश्न वाहनमालक विचारत आहेत. आरटीओतील अधिकारी याला संगणक प्रणालीतील दोष कारणीभूत असल्याचे सांगत आहेत. परंतु, संगणकीय प्रणालीचा दोष आमच्या माथी का, असा प्रश्नही वाहनमालक उपस्थित करीत आहेत.

वाहनाच्या कराचे मूल्यांकन करून देण्याची जबाबदारी आरटीओची आहे. व्यावसायिक वाहनांना खासगी वाहनांपेक्षा दुप्पट कर भरावा लागतो. कर मूल्यांकनात अशा गंभीर चुका होतातच कशा, याची तपासणी करायला हवी.- विजयकुमार दुग्गल, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटना

परराज्यातून आलेल्या वाहनांची नोंदणी करताना खासगी वाहनांना व्यावसायिक कर आकारणीचे प्रकार अपवादाने घडत आहे. ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यात दुरुस्ती केली जात आहे. तांत्रिक चुकीमुळे असे प्रकार घडत आहेत.– डॉ. अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी