महापालिकेतील शहर सुधारणा, विधी, महिला व बालकल्याण आणि क्रीडा या चार समित्यांच्या निवडणुकांमध्ये सोमवारी अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे उमेदवार अध्यक्ष व उपाध्यक्षपदी विजयी झाले. या निवडणुकीसाठी प्रथमच मनसे, भाजप आणि शिवसेना अशी महायुती झाली होती. महापालिकेतील चारपैकी तीन समित्यांची अध्यक्षपदे आता महिलांकडे गेली आहेत.
समित्यांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. या समित्यांमध्ये प्रत्येकी तेरा सदस्य असून त्यात सत्ताधारी आघाडीकडे सात, तर महायुतीकडे सहा असे संख्याबळ आहे. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे चारही समित्यांवर आघाडीचे उमेदवार विजयी झाले.
शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षपदावर काँग्रेसच्या लता राजगुरू विजयी झाल्या, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सुषमा निम्हण या निवडून आल्या. राजगुरू आणि निम्हण या सात विरुद्ध सहा मतांनी विजयी झाल्या. विधी समितीच्या अध्यक्षपदावर राष्ट्रवादीच्या सुमन पठारे, तर उपाध्यक्षपदावर काँग्रेसचे सुधीर जानजोत निवडून आले. पठारे सात विरुद्ध तीन मतांनी निवडून आल्या. या मतदानाच्यावेळी मनसेचे तिन्ही सदस्य उपस्थित नव्हते. उपाध्यक्षपदावर जानजोत सात विरुद्ध सहा अशा मतांनी निवडून आले. यावेळी मनसेचे सदस्य उपस्थित होते.
महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या वैशाली मराठे आणि उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या शारदा ओरसे विजयी झाल्या. दोन्ही पदांसाठी सात विरुद्ध पाच असे मतदान झाले. मनसेच्या कल्पना बहिरट यांचे पद रद्द झालेले असल्यामुळे त्या या मतदानात उपस्थित नव्हत्या. क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे अनिल टिंगरे आणि उपाध्यक्षपदी काँग्रेसचे मुकारी अलगुडे विजयी झाले. हे मतदान सात विरुद्ध पाच असे झाले. मनसेच्या रूपाली पाटील या मतदानात अनुपस्थित होत्या.
समित्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
  • शहर सुधारणा समिती  – लता राजगुरू, सुषमा निम्हण
  • विधी समिती – सुमन पठारे, सुधीर जानजोत
  • महिला, बालकल्याण समिती – वैशाली मराठे, शारदा ओरसे
  • क्रीडा समिती – अनिल टिंगरे, मुकारी अलगुडे

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress ncp co alliance wins the various committees main posts