पुणे : सणांच्या काळात खासगी प्रवासी सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून अवाजवी भाडेवाढ करण्यात येत असल्याचा दावा करून ग्राहक पंचायतीने याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांकडे तक्रार केली आहे. हे प्रकार रोखण्यासाठी दक्षता पथकांची स्थापना करून, प्रवासी दरपत्रक सार्वजनिक करावे, अशी मागणी पंचायतीने केली आहे.

‘सणांच्या काळात खासगी बस, टुरिस्ट टॅक्सीचालक अवाजवी दर आकारतात. एसटी, रेल्वे आणि अन्य सेवांचे आरक्षण उपलब्ध नसल्यास प्रवाशांकडून खासगी प्रवासी वाहतूक सेवेला प्राधान्य दिले जाते. त्या वेळी अवाजवी भाडे आकारण्यात येते. त्यामुळे प्रवाशांची आर्थिक फसवणूक होते,’ असे ग्राहक पंचायतीने याबाबत नेमलेल्या समितीच्या अभ्यासातून निदर्शनास आले आहे.

या समितीने काही उपाय सुचविले असून, त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, असे पंचायतीने म्हटले आहे. ‘या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने खासगी सेवांचे दर प्रति किलोमीटरनुसार निश्चित करून देण्यासाठी कार्यवाही करावी, संबंधित दरसूची प्रवासी सेवा देणाऱ्या वाहनांच्या कार्यालयात किंवा वाहनाच्या दर्शनी भागावर लावण्याबाबत निर्देश द्यावेत, प्रवाशांकडून अवाजवी प्रवासी भाडे आकारले जाणार नाही, याबाबत सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून, संस्थांकडून लिखित स्वरूपात हमीपत्र घ्यावे,’ अशा सूचना समितीने केल्या आहेत.

समितीच्या सूचना काय?

  • भाडेदर नियंत्रित करून खासगी प्रवासी वाहतूक कंपन्यांची यादी जाहीर करावी.
  • अनधिकृत भाडेवाढ करणाऱ्यांवर कठोर कारवाई
  • सार्वजनिक वाहतूक सेवा वाढवावी.
  • प्रवासी दरपत्रक सार्वजनिक करावे.
  • तक्रारींनुसार स्थानिक पातळीवर तातडीने कारवाई करावी.
  • दक्षता पथकांची स्थापना करावी.

सणांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा प्रवास सुखकर व सुरक्षित होण्यासाठी शासनाने प्रवासी सेवा देणाऱ्या कंपन्यांवर अंकुश लावणे गरजेचे आहे. शासनाने केवळ आश्वासने न देता तत्काळ अंमलबजावणी करावी. या कंपन्यांकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा, प्रवाशांचा रोष उफाळून येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. – श्रीकांत जोशी, विधी आयाम प्रमुख, मध्य महाराष्ट्र