पुणे : घोष विभागाने वादन केलेल्या ‘कदम कदम बढाए जा’च्या सुरावटींवर पांढऱ्या शुभ्र गणवेशातील छात्रांनी केलेले शिस्तबद्ध संचलन, लष्कराच्या तीनही दलांचे प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी स्वीकारलेली मानवंदना, संचलन सुरू असताना सुपर डिमोना विमानांचे आणि संचलनाच्या अखेरीस सुखोई विमानांचे उड्डाण अशा भारलेल्या वातावरणात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १४४ व्या तुकडीतील छात्रांचे मंगळवारी दीक्षान्त संचलन झाले. प्रबोधिनीतील तीन वर्षांच्या खडतर प्रशिक्षणाची फलश्रुती असलेल्या या संचलनानंतर छात्रांनी जल्लोष केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४४ व्या तुकडीतील छात्रांचे दीक्षान्त संचलन मंगळवारी खेत्रपाल संचलन मैदानावर उत्साहात आणि जल्लोषात झाले. लष्कराच्या तीनही दलांचे प्रमुख जनरल अनिल चव्हाण यांनी संचलनाची पाहणी करून मानवंदना स्वीकारली. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह, प्रबोधिनीचे कमांडंट अजय कोचर, डेप्युटी कमांडंट मेजर जनरल अजय कोचर या वेळी उपस्थित होते. जनरल अनिल चौधरी यांच्या हस्ते आफ्रिद अफरोज याला राष्ट्रपती सुवर्णपदक, अंशु कुमार याला रौप्यपदक अंशु कुमार आणि प्रवीण सिंग याला कांस्यपदकाने सन्मानित करण्यात आले. ‘रोमिओ स्क्वाड्रन’ला ‘चीफ ऑफ स्टाफ बॅनर’ने गौरविण्यात आले.

अनिल चौहान म्हणाले, की प्रबोधिनीमध्ये छात्र संचलनामध्ये नव्याने दाखल झालेल्या महिला पाहिल्या. पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन उभ्या असलेल्या महिलांचे मी विशेष अभिनंदन करतो. स्वत:ला विसरून देशाच्या सुरक्षेमध्ये दाखल व्हाल तेव्हा खरे सैनिक म्हणून तुमची ओळख प्रस्थापित होईल. भारताच्या आजूबाजूला सध्या भूराजकीय परिस्थिती बदलत आहे. दुसऱ्या बाजूला, हिंदू महासागरात पीपल्स लिबरेशन आर्मीच्या हालचाली वाढल्या आहेत. भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये राजकीय उलथापालथ आहे. अशा दोन्ही परिस्थितीत भारतीय लष्कराला लढायचे आहे. भारतीय लष्करात आता तंत्रज्ञानाची उत्क्रांती पाहायला मिळत आहे. आगामी काळात तुम्ही एकत्र येऊन नवीन युद्ध प्रणालीचा सामना करून देशाला विकासाच्या मार्गावर घेऊन जाल असा मला विश्वास आहे. भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतानाच तुम्ही आयुष्यात खूप यशस्वी व्हाल, याची मला खात्री आहे, अशा शब्दांत चौहान यांनी छात्रांशी संवाद साधला. प्रबोधिनीच्या १४४ व्या तुकडीतील ३५६ छात्रांनी दीक्षान्त संचलनामध्ये सहभाग घेतला होता. त्यापैेकी २१४ छात्र भूसेनेमध्ये, ३६ छात्र नौदलामध्ये आणि १०६ छात्र हवाई दलामध्ये पुढील प्रशिक्षण घेणार आहेत. भूतान, ताजिकिस्तान, मालदीव, अफगाणिस्तान, श्रीलंका, म्यानमार आणि बांगलादेश या मित्र राष्ट्रांतील १९ छात्र त्यांच्या देशातील प्रशिक्षण संस्थांमध्ये सहभागी होणार आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Convocation of 144th batch of nda amy