पिंपरी : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दाम्पत्याचा मृत्यू झाला. तर चार वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली. पुणे-नाशिक महामार्गावर बोऱ्हाडेवाडी येथे रविवारी ही घटना घडली.
भूपेंद्र रमेश महाजन (वय ३३) आणि कोमल भूपेंद्र महाजन (वय २६, दोघे रा. कुरूळी, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. त्यांची मुलगी प्रांजल (वय ४) ही जखमी झाली आहे. भुपेंद्र यांचे मेव्हणे उमेश प्रवीण माळी (वय २२, रा. कुरुळी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ट्रकचालक नरेश बाळासाहेब चौरे (वय २६, रा. हिंजवडी) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघेजण कुरुळी येथून रावेतकडे दुचाकीवरून चालले होते. बोऱ्हाडेवाडीतील एका पेट्रोल पंपाजवळ ट्रकचालकाने अचानक ट्रक डावीकडे वळवून भुपेंद्र यांच्या दुचाकीला धडक दिली. कोमल आणि प्रांजल या गंभीर जखमी झाल्या. दोघींना त्वरित रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान कोमल यांचा मृत्यू झाला. फौजदार अंगज तपास करीत आहेत.