लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : सोसायटीत राहणाऱ्या संगणक अभियंत्याची बदनामी करून त्याला बहिष्कृत केल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाने औंध भागातील एका सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी रुपेश जुनवणे (वय ४७), दत्तात्रय साळुंखे (वय ५०), अश्विनी पंडीत (वय ६०), सुनील पवार (वय ५२), जगन्नाथ बुर्ली (वय ५०), अश्विन लोकरे (वय ५०), अनिरुद्ध काळे (वय ५०), सुमीर मेहता (वय ४७), संजय गोरे (वय ४५), सोनाली साळुंके (वय ४५), शिल्पा रुपेश जुनवणे (वय ४५), अशोक खरात (वय ५०), वैजनाथ संत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका ४४ वर्षीय संगणक अभियंत्याने फिर्याद दिली आहे.
आणखी वाचा-श्रीमंत ‘दगडूशेठ हलवाई गणपतीला ५० लाख रुपयांचा हिऱ्याचा तिलक
तक्रारदार संगणक अभियंत्याने २००३ मध्ये औंधमधील सुप्रिया सोसायटीत सदनिका विकत घेतली. २०१६ पर्यंत त्यांनी सदनिका भाडेतत्त्वावर दिली होती. त्यानंतर अभियंता आणि त्याचे कुटुंबीय सदनिकेत राहायला आले. त्यांना सदनिकेचे नुतनणीकरण करायचे होते. सर्व कामे नियमानुसार करण्यात येत होती. त्यानंतर सोसायटीतील पदाधिकाऱ्यांनी त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. नुतनीकरण करणाऱ्या कामगारांना धमकावण्यात आले. सोसायटीतील पदाधिकाऱ्यांनी त्यांना नोटीस पाठविली, असे संगणक अभियंत्याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
सोसायटीतील पदाधिकाऱ्यांकडे त्यांनी हिशेब मागितला होता. पदाधिकाऱ्यांनी त्यांची बदनामी करण्यास सुरुवात केली. तक्रारदाराच्या मुलांबरोबर सोसायटीतील मुलांनी खेळण्यास मज्जाव करण्यात आला. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रारदार आणि त्याच्या कुटुंबीयांना सोसायटीतील कार्यक्रमास सहभागी करून घेतले नाही. एकप्रकारे कुटुंबाला पदाधिकाऱ्यांनी बहिष्कृत केले. त्यामुळे याबाबत न्यायालायात खासगी फौजदारी दावा दाखल करण्यात आला. तक्रारदार संगणक अभियंत्याच्या तक्रारीची दखल घेऊन न्यायालयाने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.