जेजुरी : श्रीक्षेत्र जेजुरी येथील खंडोबाचे मूळ ठिकाण असलेल्या कडेपठारच्या डोंगरावर श्रावण मासानिमित्त खंडोबाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची शनिवारु गर्दी केली. त्यामुळे कडेपठार डोंगर गजबजून गेला होता. श्रावण मासात गडावर दररोज भाविकांची मोठी गर्दी होत आहे. शनिवारी पुणे, सातारा, नगर ,नाशिक आदी भागातून आलेल्या भाविकांची संख्या जास्त होती. वन खात्याने वृक्ष लागवड केल्याने निसर्ग बहरला आहे. या डोंगरांमध्ये हरीण, मोर ,लांडगा, कोल्हा, ससा,भेकर, रानमांजर आदी प्राण्यांबरोबरच विविध पक्षांचे वास्तव्य आहे. त्यामुळे पर्यटकांची गर्दी वाढली आहे.
कडेपठारच्या डोंगरात विकास कामे
जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत जेजुरीला सुमारे साडेतीनशे कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यातून प्राचीन खंडोबा गडाचे संवर्धन व दुरुस्ती केली जात आहे. त्याचप्रमाणे कडेपठारच्या मुख्य मंदिर परिसरामध्ये पुरातत्व खात्याच्या अंतर्गत विकास कामे सुरू झाली आहेत. कडेपठारचा डोंगर चढण्यासाठी दगडी पायऱ्या तयार करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत सुमारे ३५ टक्के पायऱ्यांचे काम पूर्ण झाले असून पायऱ्याच्या दुतर्फा बसण्यासाठी जागा आणि गड चढताना आधारासाठी लोखंडी कठडे बसवण्यात आले आहेत.
जेजुरीला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची मागणी
कडेपठारचा परिसर निसर्गाने सुख समृद्ध व हिरव्यागार वनराईने कायम बहरलेला असतो असतो. या परिसरामध्ये कडेपठारचे खंडोबा मंदिर, जेजुरीचा खंडोबा गड जयाद्री पर्वत रांगांमध्ये आहे . जेजुरीमध्ये ऐतिहासिक पेशवे तलाव, होळकर तलाव, होळकरांची छत्री, चिंचेची बाग, लवथळेश्वर मंदिर आदी प्राचीन वास्तू आहेत याशिवाय कऱ्हा नदी आहे . त्यामुळे जेजुरीला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करावे, अशी मागणी श्री मार्तंड देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंगेश घोणे यांनी केली आहे.