पुणे शहरात गेल्या काही वर्षांपासून सायबर गुन्हय़ांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. पुण्यात सायबर गुन्हय़ांच्या तक्रारी दाखल करण्यासाठी स्वतंत्र सायबर पोलीस ठाण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. गृह खात्याने सायबर पोलीस ठाण्याला मंजुरी दिली आहे, मात्र काही कारणास्तव स्वतंत्र सायबर पोलीस ठाण्याचे कामकाज रखडले होते. नवीन वर्षांत सायबर गुन्हेविषयक तक्रारी दाखल करण्यासाठी पुणेकरांना स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे मिळण्याची आशा आहे. त्या दृष्टीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
शहरातील वाढत्या सायबर गुन्हय़ांच्या पाश्र्वभूमीवर सात वर्षांपूर्वी सायबर पोलीस ठाण्याची संकल्पना मांडण्यात आली होती, मात्र काही कारणास्तव सायबर पोलीस ठाण्याचे काम रखडले होते. महाराष्ट्रातील पहिले सायबर पोलीस ठाणे मुंबईतील वांद्रे रेक्लमेशन सेंटरच्या (बीकेसी) आवारात सुरू करण्यात आले. राज्यातील अन्य शहरांत सायबर पोलीस ठाण्याच्या निर्मितीसाठी पावले उचलण्यात आली. साधारणपणे आठ वर्षांपूर्वी पुण्यातही स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे असावे, अशी संकल्पना मांडण्यात आली होती. गृह खात्याने या प्रस्तावाला मंजुरी दिली होती, मात्र पुण्यात सायबर पोलीस ठाणे साकारण्यात काही तांत्रिक अडचणी होत्या. सायबर गुन्हय़ांच्या तक्रारी दाखल करण्यासाठी नागरिकांना पोलीस आयुक्तालयातील सायबर गुन्हे शाखा किंवा पोलीस ठाण्यात जावे लागते. सायबर गुन्हे शाखेकडे आलेल्या तक्रारअर्जाची पडताळणी करण्यात आल्यानंतर या बाबतची पुढील कार्यवाही करण्यासाठी पोलीस ठाण्यांकडे पाठवले जातात. त्यानंतर नागरिकांनी दिलेल्या तक्रारींवरून गुन्हे दाखल करण्यात येतात. सायबर पोलीस ठाण्याची निर्मिती केल्यानंतर नागरिकांच्या तक्रारी दाखल करून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली जाईल, अशी या मागची संकल्पना आहे. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या आवारात स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे साकारण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. नवीन वर्षांत पुणे पोलिसांकडून तक्रारदारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या काही वर्षांपासून पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे तक्रारींचा ओघ सुरू आहे. यंदाच्या वर्षी नोव्हेंबरअखेरीपर्यंत आर्थिक फसवणूक, समाज माध्यामांचा वापर करून फसवणूक, गोपनीय माहिती चोरून खात्यातील पैसे लांबवणे, मोबाइलची गोपनीय माहिती चोरून फसवणूक अशा प्रकारच्या पाच हजार १२७ तक्रारी दाखल झाल्या आहेत.
ही आहेत वैशिष्टय़े
- सायबर पोलीस ठाण्याची पहिल्यांदाच निर्मिती
- सायबर गुन्ह्य़ांच्या तक्रारी दाखल करता येणार
- तक्रारी आल्यानंतर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया
