पुणे : कारगील परिसरात सीमेवर तैनात असलेल्या लष्करी जवानाला सायबर चोरट्यांमुळे पुणे गाठावे लागले. सायबर चोरट्यांनी जवानाच्या बँक खात्यात फसवणूक प्रकरणातील ५२५ रुपये जमा केले होते. संबंधित बँक खाते गोठविण्यात आल्याने खाते पुन्हा सुरु करण्यासाठी जवानाला अडीच हजार किलोमीटरचा प्रवास करावा लागला. सायबर पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार जवानाने केल्यानंतर खाते पु्न्हा कार्यान्वित करण्यात आले.

शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष, तपास यंत्रणांकडून कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. फसवणूक केल्यानंतर सायबर चोरटे बँक खात्यात वर्ग करतात. त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने खात्यातील रक्कम परस्पर चोरटे त्यांच्या खात्यात वर्ग करतात. सायबर चोरट्यांकडे बँक खातेदारांची माहिती उपलब्ध असल्याने असे प्रकार घडतात. कारगिल येथे तैनात असलेल्या एका जवानाच्या खात्यात सायबर चोरट्यांनी ५२५ रुपये जमा केले होते. अशा प्रकारे फसवणूक झाल्यानंतर तक्रारदार नॅशनल सायबर क्राईम रिपाेर्टिंग पोर्टल (एनसीआरबी) तक्रार नोंदविण्यात येते किंवा तक्रारदार ‘१९३०’ या टोल क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवितो.

हेही वाचा >>> भाजप मंत्र्याच्या प्रकल्पाला अजितदादांचा खो; चाणक्य केंद्रा’च्या आरेखनात बदलाची सूचना, नावालाही आक्षेप

सायबर चोरट्यांनी ज्या खात्यावर रक्कम जमा केली आहे. ते खाते गोठविण्यात येते. खाते गोठविण्यात आल्यानंतर चोरटे रक्कम काढू शकत नाही. लष्करी जवानाच्या खात्यावर चोरट्यांनी ५२५ रुपये जमा केल्यानंतर जवानाला बँक खात्यातून रक्कमही काढता येत नव्हती. बँक व्यवहार ठप्प झाल्यानंतर जवान कारगील परिसरातील बँकेत गेले होते. चौकशीत बँक खाते पुणे पोलिसांनी गोठविल्यची माहिती जवानाला मिळाली. त्यानंतर जवानाने अडीच हजार किलोमीटरचा प्रवास करून पुणे गाठले. जवानाची सर्व रक्कम संबंधित खात्यात होती. त्यामुळे जवानाने तातडीची सुटी घेऊन पुण्यात आला.

पोलिसांनी जवानाच्या कागदपत्रांची पडताळणी केली. चौकशीत खाते जवानाचे असल्याचे समजल्यानंतर संबधित खाते पुन्हा कार्यान्वित करण्यात यावे, असे पत्र पोलिसांनी बँकेला दिले. संबंधित प्रक्रिया पार पडल्यानतंर जवानाचे खाते पुन्हा कार्यान्वित झाले.

बँक खाते गोठविल्यानंतर काय करावे ?

सायबर चोरट्यांनी फसवणूक प्रकरणातील अगदी दहा रुपये दुसच्याच्या खात्यात जमा केली. तर संबंधित खाते गोठविण्यात येते. याबाबत बँक खातेदाराला माहिती देते किंवा पाेलिसांकडून खातेदाराला मेल पाठविण्यात येतो. त्यानंतर खातेदार पोलीस ठाण्यात जाऊन किंवा ईमेलच्या माध्यमातून उत्तर देऊ शकतो. फसवणूक प्रकरणातील रक्मक गोठविण्यात येऊन खाते वापरास परवानगी मिळावी, याबाबत पोलिसांना सांगितल्यास खाते पुन्हा कार्यान्वित होते.

एनसीआरबी म्हणजे काय ?

फसवणूक झाल्यानंतर ‘एनसीआरबी’च्या संकेतस्थळावर किंवा ‘१९३०’ या क्रमांकावर तक्रार आल्यास सायबर चोरट्यांनी फसवणुकीसाठी वापरलेल्या खात्याची माहिती घेण्यात येते. त्यानंतर बँक खाते गोठविण्यात येते. पुण्यातील एका फसवणूक प्रकरणात सायबर चोरट्यांनी अडीच हजार खात्यात रक्कम हस्तांतरित केली होती.

बँक खातेदाराची चूक नसताना सायबर चोरट्यांमुळे त्याला नाहक मनस्तापाला सामोर जावे लागते. एखाद्याचे खाते गोठविण्यात आल्यास फसवणुकीची रक्कम वगळून अन्य बँक व्यवहार किंवा खाते कार्यान्वित ठेवता येते. खातेदाराने कागदपत्रे दाखविल्यास पुढील कार्यवाही करणे सोपे होते. – स्वप्नाली शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे, शिवाजीनगर