पुणे : दक्षिण चीनच्या समुद्रात तयार झालेल्या ‘विफा’ या चक्रीवादळाच्या उर्वरित प्रभावातून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या क्षेत्रामुळे महाराष्ट्रासह मध्य भारतात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
‘विफा’ या चक्रीवादळामुळे फिलिपिन्स, हाँगकाँग, व्हिएतनाम, चीन, थायलंड अशा देशांत काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. चक्रीवादळ धडकल्यानंतर त्याच्या उर्वरित प्रभावातून आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रवास पश्चिमेकडे होत असल्याने मध्य भारतासह महाराष्ट्रातही पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हवामानतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्यासाठी वेगवेगळे घटक कारणीभूत ठरतात. त्यानुसार एखाद्या चक्रीवादळाच्या उर्वरित प्रभावातूनही कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊ शकते. ही सर्वसामान्य स्थिती आहे. यापूर्वीही असे घडलेले आहे. कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यावर त्याची तीव्रता टप्प्याटप्प्याने वाढत जाऊन पुढे त्याचे रूपांतर चक्रीवादळात होते. अरबी समुद्रात किंवा बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होण्याचा काळ सर्वसाधारणपणे मान्सूनपूर्व (एप्रिल ते जून) किंवा मान्सूनोत्तर (ऑक्टोबर ते डिसेंबर) असतो. मोसमी पावसाच्या काळात चक्रीवादळाची निर्मिती होणे दुर्मीळ असते. मोसमी पावसाच्या काळात सातत्याने कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होत असते. ‘विफा’ चक्रीवादळाच्या उर्वरित प्रभावातून बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र त्याचाच एक भाग आहे.
‘विफा’ चक्रीवादळाच्या उर्वरित प्रभावातून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकत असल्याने मोसमी वाऱ्यांची गती वाढली आहे. त्यामुळे मध्य भारतात पावसासाठी पूरक स्थिती निर्माण होऊन पाऊस पडत आहे. त्यानुसार पुढील तीन दिवस राज्यातही पावसाची शक्यता आहे. त्यानंतर काही प्रमाणात पाऊस पुन्हा कमी होऊ शकतो. – एस. डी. सानप, शास्त्रज्ञ, भारतीय हवामानशास्त्र विभाग