पिंपरी- चिंचवड : महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांच्या कार्यकाळात अनेक भ्रष्टाचार झाल्याचे आरोप झाले. या प्रकरणानंतर आता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर विकासकामांच्या नावावर २२ हजार कोटींचं कर्ज केल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. अजित पवार हे पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांची बदली नुकतीच नाशिक येथे झाली. त्यांच्यावर आगामी कुंभमेळ्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान, शेखर सिंह यांची बदली झाल्यानंतर अनेक संस्था, कंत्राटदार, तसेच नेत्यांनी  त्यांचा भव्य- दिव्य असा सत्कार करून, त्यांना निरोप दिला. त्यावरून शेखर सिंह यांच्यावर आरोप- प्रत्यारोप होत आहेत. तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांच्या कार्यकाळात अनेक भ्रष्टाचाराची कामे झाल्याच बोललं जात आहे.

पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेवर विकासकामांच्या नावाने तब्बल २२ हजार कोटींचं कर्ज केल्याचं बोललं जातं आहे. अजित पवार म्हणाले, महानगर पालिकेवर २२ हजार कोटींचा कर्जाचा बोजा झाला आहे. याबाबत श्रावण हर्डीकर यांना विचारलं दबक्या आवाजात अशी चर्चा सुरू आहे. याविषयी त्यांना सत्य पडताळायला सांगितलं आहे. पिंपरी- चिंचवड शहराचं २५ वर्षं मी नेतृत्व केलं आहे. मी कधीही एक रुपयाचं शहरावर कर्ज होऊ दिलं नाही. असे अजित पवार यांनी म्हटले आहे.