Delay in approval of administrative works in Pune District Gram Panchayats due to Election Code of Conduct | Loksatta

आचारसंहितेमुळे पुणे जिल्हा ग्रामपंचायतींमधील कामांच्या प्रशासकीय मान्यता लांबणीवर

जिल्हा नियोजन समितीने पुणे जिल्ह्यातील विकासकामांचा १०५८ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला आहे. मात्र, ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमुळे या कामांच्या प्रशासकीय मान्यतेला उशीर होणार आहे.

आचारसंहितेमुळे पुणे जिल्हा ग्रामपंचायतींमधील कामांच्या प्रशासकीय मान्यता लांबणीवर
पुणे जिल्हा परिषद (संग्रहित छायाचित्र)

पुणे जिल्ह्यात २२१ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. परिणामी जिल्हा नियोजन समितीने (डीपीसी) मंजूर केलेल्या या ग्रामपंचायतींच्या कामांच्या प्रशासकीय मान्यता लांबणीवर पडल्या आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हा परिषदेला दिले आहेत. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील डीपीसीच्या कामांना आचारसंहिता संपल्यानंतरच मान्यता मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा- पिंपरीत उपोषणाला बसलेले कामगार रुग्णालयात दाखल

जिल्हा नियोजन समितीने जिल्ह्यातील विकासकामांचा १०५८ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला आहे. यामध्ये ग्रामपंचायतींशी निगडित जनसुविधा, रस्ते तसेच निवडणूक होणाऱ्या गावांना जोडले जाणारे इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण रस्ते, आरोग्य केंद्र, सुविधा बंधारे, शाळा दुरुस्ती या स्वरूपाची कामे आहेत. मात्र, या कामांची मंजुरी, त्यांचे आदेश २ नोव्हेंबर रोजी काढण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात या कामांची माहितीपुस्तिका चार-पाच दिवसांनी बाहेर आली. जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत स्पष्ट आदेश प्रसृत केले असून ज्या ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. त्या ग्रामपंचायत क्षेत्रातील कामांच्या प्रशासकीय मान्यता निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर द्याव्यात.

हेही वाचा- गणपतीच का? ३३ कोटी देव अभ्यासक्रमात घ्या!

पुणे जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. १० नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. १८ डिसेंबरला या निवडणुकांसाठी मतदान होत आहे. निवडणूक आचारसंहितेचा कालावधी २३ डिसेंबर रोजी संपणार असून यानंतरच प्रशासकीय मान्यता देण्याची कार्यवाही केली जाणार आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 18:51 IST
Next Story
पुणे: वारजे, कर्वेनगर, कोथरूडचा पाणीपुरवठा गुरुवारी दिवसभर बंद