पिंपरीतील विकासकामांना विलंब, आमदारांचा संताप ; जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची झाडाझडती

अधिकाऱ्यांनी चालढकल करु नये. तांत्रिक कारणे देत बसू नये. प्रशासक काळात रखडलेली कामे तात्काळ मार्गी लावावी, अशी तंबी त्यांनी दिली.

पिंपरीतील विकासकामांना विलंब, आमदारांचा संताप ; जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची झाडाझडती
( भाजप आमदार महेश लांडगे )( संग्रहित छायचित्र )

भाजपच्या पिंपरी पालिकेतील सत्ताकाळात सुरू झालेली तथा पूर्णत्वाला आलेली विकासकामे जाणीवपूर्वक रखडवण्यात येत असल्याचा आरोप करत आमदार महेश लांडगे यांनी पालिका अधिकाऱ्यांना पुन्हा धारेवर धरले. अधिकाऱ्यांनी चालढकल करु नये. तांत्रिक कारणे देत बसू नये. प्रशासक काळात रखडलेली कामे तात्काळ मार्गी लावावी, अशी तंबी त्यांनी दिली. आंद्रा, भामा आसखेड प्रकल्पाचे पाणी शहराला मिळण्याबाबत प्रशासनाची संथ कार्यवाही खपवून घेतली जाणार नाही, अशा इशाराही त्यांनी दिला.

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील महत्त्वाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आमदार लांडगे यांनी चिंचवडच्या ऑटो क्लस्टर सभागृहात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सहशहर अभियंता मकरंद निकम, संजय कुलकर्णी, श्रीकांत सवणे आदी उपस्थित होते. आयुक्त राजेश पाटील बैठकीला उपस्थित नव्हते.

त्रिवेणीनगर येथील रस्त्याचे काम पूर्ण करावे, बाधीत नागरिकांची पुनर्वसन प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी. टाळगाव चिखली येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम तातडीने मार्गी लावावे, टाऊन हॉलच्या कामाला गती द्यावी. चिखली ते चऱ्होली दरम्यान पालिकेच्या ताब्यात आलेल्या जागेत गोशाळा विकसित करता येईल का, याबाबत पडताळणी करावी. भोसरी थोरल्या पादूका चौकातील संतशिल्प व म्युरल्सचे काम लवकर पूर्ण करावे. भोसरीत लहान मुलांच्या रुग्णालयाचे नियोजन करावे. भोसरीतील कुस्ती संकुल व कबड्डी संकुलमधील खेळाडूंना राहण्याची सोय व्हावी.

याकरिता १२० खाटांच्या क्षमतेच्या वसतीगृहाचे काम लवकर करावे. यमुनानगर, निगडी भागातील अनेक घरांवर रेडझोनची मार्किंग दाखवली जात आहे. ती दुरूस्त करुन घ्यावी. संरक्षण विभागाकडून रेडझोनची हद्द निश्चित करावी. आंद्रा, भामा आसखेड प्रकल्प, भूसंपादनाबाबत प्रलंबित प्रकरणे, क्रिकेट स्टेडियम, सफारी पार्क, मोशी आणि पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया गतीमान करण्यासाठी तसेच चिखली हॉस्पिटल जागेबाबत संबंधित विभागांशी तातडीने बैठक घ्यावी. कॅनबे चौक ते भक्ती-शक्ती चौक हा मार्ग रेडझोन हद्दीतून नव्याने विकसित करण्यासाठी अहवाल सादर करावा. अनेक सोसायट्यांमध्ये मैलाशुध्दीकरण प्रकल्प बंद अवस्थेत आहेत. याबाबत सर्व्हेक्षण करुन संबंधितांवर दंडात्मक करावी. पर्यावरण संवर्धनाला चालना द्यावी, अशा विविध सूचनाही आमदार लांडगे यांनी केल्या आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Delay in development works in pimpri anger of mla pune print news amy

Next Story
पुणे : संगणक अभियंत्याच्या कुटुंबीयांचे रेल्वे प्रवासात दागिने लंपास
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी