पुणे : अक्षय तृतीयेसाठी कोकणातून आंब्यांची आवक वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अक्षय तृतीयेला आंब्यांचे दर जास्त आहेत. किरकोळ आणि घाऊक बाजारात तयार आंब्यांना ग्राहकांकडून मागणी आहे. मागणीच्या तुलनेत तयार आंब्यांचा तुटवडा जाणवत आहे.
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला आंब्यांना मागणी वाढते. पूर्वजांना आंब्यांचा नैवेद्य अर्पण केला जातो. अक्षय तृतीया बुधवारी (३० एप्रिल) असून, मार्केट यार्डातील फळबाजारात आंब्यांची आवक वाढली आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातून रविवारी हापूस आंब्यांच्या साडेचार ते पाच हजार पेट्यांची आवक झाली. गेल्या वर्षी अक्षय तृतीयेला कोकणातून आठ ते दहा हजार पेट्यांची आवक झाली होती. यंदा वातावरणातील बदलामुळे कोकणात आंब्यांची लागवड ५० टक्के झाली आहे. मागणीच्या तुलनेच्या आंब्यांची आवक कमी प्रमाणावर होत असल्याने दर जास्त आहेत, असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील आंबा व्यापारी नितीन कुंजीर आणि करण जाधव यांनी सांगितले.
घाऊक आणि किरकोळ बाजारात आंबा खरेदीसाठी मंगळवारी गर्दी झाली होती. ग्राहकांकडून एक आणि दोन डझनाच्या पेटीला मागणी आहे. एक डझन तयार आंब्यांना प्रतवारीनुसार ५०० ते ८०० रुपये दर मिळाले आहेत. दाेन डझन आंब्यांच्या पेटीला प्रतवारीनुसार ११०० ते १२०० रुपये दर मिळाले आहेत.
हापूसचा हंगाम शेवटच्या टप्प्यातयंदा वातावरणातील बदलामुळे लागवडीवर परिणाम झाला आहे. सिंधूदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातून आवक कमी प्रमाणावर होत आहे. यंदा आंब्यांचा हंगाम लवकर संपणार आहे. दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आंब्यांचा हंगाम सुरू असतो. यंदा १० ते १५ मे पर्यंत आंब्यांचा हंगाम सुरू राहणार आहे. उष्मा वाढल्याने आंबा लवकर पक्व होत आहे, असे आंबा व्यापारी नितीन कुंजीर आणि करण जाधव यांनी नमूद केले.
कर्नाटकातून आंब्यांची आवक वाढली
यंदा हापूसचा हंगाम लवकर संपणार आहे. कर्नाटकातील आंब्यांचा हंगाम महिनाभर उशिराने सुरू झाला आहे. अक्षय तृतीयेसाठी कर्नाटकातील आंब्यांची आवक वाढली आहे. रविवारी (२७ एप्रिल) चार ते सात डझनाच्या तीन हजार पेट्यांची आवक कर्नाटकातून झाली, तसेच दोन डझनाच्या २० हजार पेट्यांची आवक वाढली. कर्नाटकातील आंब्यांची आवक गुरुवारपासून (एक मे) वाढणार आहे. कर्नाटकातील आंब्यांचा हंगाम साधारणपणे १५ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. कर्नाटकातील एक डझन तयार आंब्यांना प्रतवारीनुसार ४०० ते ६०० रुपये डझन दर मिळाले आहेत, अशी माहिती कर्नाटक आंब्यांचे व्यापारी रोहन उरसळ यांनी दिली. डिसेंबर, जानेवारीत कर्नाटकातील आंब्यांना चांगला मोहोर आला होता. हवामान बदलामुळे मोहोर गळाला. त्यामुळे कर्नाटकातील आंब्यांचा हंगाम उशिराने सुरू झाला. कर्नाटकातून पायरी, लालबाग, बदाम या आंब्यांची आवक वाढली आहे, असे उरसळ यांनी सांगितले.
खरेदीसाठी गर्दी
अक्षय तृतीयेनिमित्त पूर्वजांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे. दवणा, फुले, वाळा, तसेच आंबा खरेदीसाठी शनिपार, मंडई, हुतात्मा बाबू गेनू चौक परिसरात मंगळवारी गर्दी झाली होती. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात सकाळपासून आंबा, फुले खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती.