दत्ता जाधव
पुणे : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडमध्ये १ जानेवारी ते १० जानेवारी या काळात सिल्लोड कृषी- कला- क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाला आर्थिक रसद पुरविण्यासाठी कृषी खात्यातील अधिकारी आणि कृषी निविष्ठांच्या पुरवठादारांच्या संघटनांना तोंडी आदेश देण्यात आले आहेत. कृषिमंत्र्यांच्या या फतव्यामुळे संपूर्ण कृषी विभागच वेठीस धरला गेला आहे.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या सिल्लोडमध्ये कृषी, क्रीडा, सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी कृषी विभागातील संचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी विभागाला विविध प्रकारच्या निविष्ठा पुरविणाऱ्या ठेकेदारांना आर्थिक रसद पुरविण्यासाठी तोंडी आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी कृषी विभागातील अधिकारी वर्ग कामाला लागला आहे.दरम्यान, याप्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
पुण्यात बैठका घेऊन आदेश
महोत्सवासाठी सुमारे पंधरा कोटी रुपये संकलित करण्याचे आदेश आल्याची चर्चा आहे. ठिबक सिंचन संच, शेततळय़ाचा प्लास्टिक कागद, मिल्चग पेपर, शेडनेट, हरितगृह उभारणे, संरक्षित शेतीचे साहित्य, खते, बियाणे, यांत्रिक औजारे पुरवठादार संस्था, संघटनांनाही आर्थिक रसद पुरविण्याचे आदेश आले आहेत. या पुरवठादारांच्या संघटनांच्या बैठका गेल्या आठवडय़ापासून पुण्यात सुरू आहेत. या बैठकांमधून पुरवठादारांनी प्रवेशिका खरेदी कराव्यात, असे थेट आदेश देण्यात आले आहेत. संकलित होणारी आर्थिक रसद रोखीने जमा करण्याचे आदेश आहेत. या निधी संकलनात मंत्र्यांच्या मर्जीतील संचालकांनी विशेष पुढाकार घेतला आहे.
कृषी विभागात अनागोंदी कारभार सुरू आहे. सिल्लोड महोत्सवासाठी सुमारे पंधरा कोटी रुपये जमा करण्याचे आदेश देण्यात आल्याचे कळते. संचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना निधी संकलनाचे लक्ष्य दिले गेले आहे. महोत्सवात फक्त नाच-गाण्याचा कार्यक्रम आहे. शेतकरी प्रबोधन फक्त नावापुरतेच आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण पाठविले गेले आहे, ते उद्घाटनाला येणार असतील तर तो शेतकऱ्यांचा घोर अपमान ठरेल.
– वसंत मुंडे, उपाध्यक्ष ओबीसी सेल, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस</p>
प्लॅटिनम, डायमंड प्रवेशिकांचे गौडबंगाल
महोत्सवातील विविध कार्यक्रमांसाठी प्रवेशिका छापण्यात आल्या आहेत. प्लॅटिनम प्रवेशिकेसाठी २५ हजार, तर डायमंड प्रवेशिकेसाठी १५ हजार रुपये, गोल्ड प्रवेशिकेसाठी १० हजार रुपये आणि सिल्व्हर प्रवेशिकेसाठी ५ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. या प्रवेशिकांवर आसन क्रमांक किंवा अन्य कोणतीही नोंद नाही. या प्रवेशिका घेण्याचे बंधन पुरवठादार आणि अधिकाऱ्यांवर आहे. कृषी निविष्ठा पुरवठादरांच्या संघटनांना सुमारे ४० ते ५० प्रवेशिका घेण्याचे विनंती-आदेश अधिकाऱ्यांकडून गेले आहेत.