एकाच पाण्याच्या टाकीचे दोनदा उद्घाटन
पिंपरी गावातील विकासकामांच्या श्रेयावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष पुन्हा आमने-सामने आले आहेत. येथील पाण्याच्या टाकीचे एकाच दिवशी दोन वेळा उद्घाटन करण्यात आले. या मुद्दय़ावरून दोन्ही पक्षात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. चार महिन्यांपूर्वी अशाच वादात तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा दौरा रद्द करण्याची वेळ महापालिकेवर आली होती.
पिंपरी गावात (प्रभाग क्रमांक २१) अनुसया वाघेरे विद्यालयातील प्रांगणात उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन महापौर माई ढोरे यांच्या हस्ते होणार होते. मात्र, त्याआधीच राष्ट्रवादीने उद्घाटन उरकून घेतले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक डब्बू आसवानी, उषा वाघेरे, निकिता कदम आदी या वेळी उपस्थित होते. त्यानंतर महापौर माई ढोरे यांच्या हस्ते दुसऱ्यांदा उद्घाटन झाले. या वेळी भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे, माजी नगरसेवक संतोष कुदळे, अमर कापसे आदी उपस्थित होते.
चार महिन्यांपूर्वी श्रेयवादातून असाच प्रकार घडला होता. भैरवनाथ मंदिर येथील बहुउद्देशीय इमारतीचे भूमिपूजन, जिजामाता रुग्णालयाचे उद्घाटन, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याच्या कामाचे भूमिपूजन आणि शहीद हेमू कलानी उद्यानाचे सुशोभीकरण या कामांचे उद्घाटन २८ ऑगस्ट रोजी तत्कालीन पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार होते.