जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र जेजुरी येथील खंडोबा देवास एका भाविकाने १६ लाख रुपये किमतीचा ११ किलो वजनाचा चांदीचा त्रिशूल आज अर्पण केला. पुणे येथील रांका ज्वेलर्स यांच्याकडे हा त्रिशूल त्यांनी खास बनवून घेतला आहे.
श्री खंडोबा देवसंस्थानचे मुख्य विश्वस्त मंगेश घोणे यांनी हा त्रिशूल स्वीकारला. थेऊर येथील खंडोबाभक्त सुजित तात्यासाहेब काळे यांनी नवरात्र उत्सवानिमित्त श्री खंडोबा देवास शुद्ध चांदीचा अकरा किलो वजनाचा त्रिशूल अर्पण केला. श्री खंडोबा गडावर त्यांनी अभिषेक पूजा केल्यानंतर त्रिशूल देवाच्या चरणी अर्पण करण्यात आला. हा त्रिशूल पाच फूट उंचीचा असून, श्री मार्तंडभैरवाजवळ ठेवला जाणार असल्याची माहिती मंगेश घोणे यांनी दिली. मार्तंड देवस्थानच्या वतीने सुजित काळे यांचा खंडोबाची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.