पुणे : एव्हरेस्ट बेस कॅम्प, आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर किलीमांजारो आणि आता युरोप खंडातील सर्वात उंच शिखर माऊंट एलब्रुस सर करण्याची किमया साताऱ्याची ‘अजिंक्य कन्या’ धैर्या हिने साध्य केली आहे आणि तीही वयाच्या तेराव्या वर्षीच. गिर्यारोहण हा छंद जोपासत इतक्या लहान वयात तीन खंडातील तीन शिखरे सर करणारी धैर्या भारतातील पहिली मुलगी ठरली आहे. अशा धैर्याच्या हिमतीला शनिवारी (१३ सप्टेंबर) जिद्द पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

धैर्या ज्योती विनोद कुलकर्णी ही साताऱ्याची. त्यामुळे अजिंक्यतारा किल्ल्याच्या अंगाखांद्यावर बागडतच ती लहानाची मोठी झाली. सध्या ती सातारा येथे इयत्ता आठवीत शिकत आहे. तिच्या गिर्यारोहणाच्या छंदाला पालकांनी केवळ खतपाणी घातले असे नव्हे तर प्रोत्साहन देत तिचे धैर्य कसे वाढेल याची खबरदारी घेतली.

जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या एव्हरेस्टचा बेस कॅम्प सर केला. त्यावेळी तिचे वय अवघे बारा वर्षे होते. आई-वडील यांच्याशिवाय ही मोहिम पार पाडणारी ती बहुदा भारतातील पहिली ठरली. त्यानंतर लगेच तिने आफ्रिका खंडातील सर्वात उंच असलेले किलीमांजारो शिखर सर केले. आता नुकतेच तिने युरोप खंडातील माऊंट एलब्रुस हे शिखर सर केले आहे.

ही मोहीम संपवून सातारा येथे परतल्यावर पवई नाका येथे जनता सहकारी बँक, मावळा फौंडेशन व गुरुकूल स्कूल, गुजराथी अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीतर्फे धैर्याचे जंगी स्वागत केले गेले. आता पुण्यातील रंगत-संगत प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी (१३ सप्टेंबर) धैर्या हिला जिद्द पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात सकाळी अकरा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष आणि धैर्या हिचे वडील विनोद कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत.

धैर्याची कामगिरी

एव्हरेस्ट बेस कॅम्प – १७,५९८ फूट

माऊंट किलीमांजारो – १९,३४१ फूट

माऊंट एलब्रुस – १८, ५१० फूट