पुणे : अनेक जण किरकोळ अंगदुखीसाठी नियमितपणे वेदनाशामक गोळ्या घेतात. याचबरोबर आहारातही अनेकांच्या मिठाचे प्रमाण अधिक असते. या सामान्य वाटणाऱ्या, परंतु, दैनंदिन सवयी मूत्रपिंडांवर गंभीर परिणाम करू शकतात, असा इशारा मूत्रविकारतज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे या सवयींचे धोके समजून घेऊन त्यापासून दूर राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

वैद्यकीय सल्ल्याविना वेदनाशामक औषधांचा वापर वाढत आहे. ही औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळतात. ही बिगरस्टेरॉईड वेदनाशामक औषधे प्रोस्टॅग्लँडिन्स नावाच्या संयुगांना रोखून वेदना आणि जळजळ कमी करतात. हीच प्रोस्टॅग्लँडिन्स मूत्रपिंडांमध्ये रक्तप्रवाह नियंत्रित करण्याचेही काम करतात. त्यामुळे या संयुगांना रोखल्यामुळे मूत्रपिंडांमध्ये रक्ताचा प्रवाह कमी होतो, आणि काही व्यक्तींमध्ये विशेषतः आधीपासून मूत्रपिंडाचा आजार, हृदयविकार किंवा शरीरातील पाण्याची कमतरता आहे अशांना तीव्र मूत्रपिंडविकाराचा धोका होऊ शकते. या औषधांचा दीर्घकालीन वापर मूत्रपिंडाच्या आजाराला कारणीभूत ठरतो आणि कालांतराने मूत्रपिंड कायमस्वरूपी निकामी होण्याची शक्यता वाढते, अशी माहिती मूत्रविकारतज्ज्ञ डॉ. सुरेश पाटणकर यांनी दिली.

समुद्री मीठ किंवा गुलाबी मीठ हे सर्व प्रकार रसायनशास्त्रीयदृष्ट्या एकसारखेच असतात. काही मिठांमध्ये सूक्ष्म खनिजे असू शकतात, परंतु त्यांचे प्रमाण इतके नगण्य असते की त्यामुळे त्या मिठाला आरोग्यदायी म्हणता येत नाही. मूत्रपिंडांच्या आरोग्यावर परिणाम करणारा मुख्य घटक म्हणजे मिठातील सोडियम. आपण जास्त प्रमाणात मीठ खातो, तेव्हा शरीरातील रक्तदाब वाढतो, आणि हा वाढलेला रक्तदाब हा मूत्रपिंड निकामी होण्यामागील एक प्रमुख कारण ठरतो. जास्त मीठ खाल्ल्याने मूत्रपिंडांना शरीरातील अतिरिक्त सोडियम बाहेर टाकण्यासाठी अधिक कार्य करावे लागते. दीर्घकाळ असा ताण येत राहिल्यास मूत्रपिंडांची कार्यक्षमता कमी होऊ लागते आणि मूत्रपिंड विकार होण्याचा धोका वाढतो, असे रुबी हॉल क्लिनिकमधील मूत्रविकारतज्ज्ञ डॉ. क्षितिज रघुवंशी यांनी सांगितले.

जास्त पाणी पिणेही घातक

दिवसभरात ६–७ लिटर पाणी पिणे हे मूत्रपिंडाच्या आजारांपासून संरक्षण करते, असा समज आहे. मात्र वैद्यकीय दृष्टिकोनातून ही सवय काही वेळा आरोग्यासाठी घातक ठरू शकते. अर्थात, योग्य प्रमाणात शरीरातील पाणी असणे हे मूत्रपिंडांच्या कार्यासाठी आवश्यक आहे. पाणी हे मूत्रपिंडांना रक्तातील विषारी घटक शुद्ध करण्यास मदत करते. मात्र जास्त प्रमाणात पाणी पिण्यामुळे शरीरात हायपोनेट्रेमिया होतो. यात रक्तातील सोडियमचे प्रमाण धोकादायकरीत्या कमी होते. यामुळे मेंदू सुजणे, अपस्माराचे झटके येणे अथवा अपवादात्मक परिस्थितीत मृत्यूही होऊ शकतो. बहुतेक निरोगी प्रौढ व्यक्तींसाठी दररोज २–३ लिटर पाणी पुरेसे असते. मात्र हे प्रमाण व्यक्तीच्या शारीरिक हालचाल, हवामान आणि आरोग्याच्या स्थितीनुसार बदलू शकते, असेही मूत्रविकारतज्ज्ञांनी नमूद केले आहे.

कोणत्या सवयी टाळाव्यात…

  • वेदनाशामक औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या.
  • तहान लागल्यानंतरच पाणी प्यावे.
  • आहारातील मिठाचे सेवन कमी करावे.