पुणे : हिंजवडी, खराडी आणि मगरपट्टा परिसरातील वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) आठवडाभरापासून सुरू असलेली ‘डबल डेकर’ बसची चाचणी यशस्वी ठरली आहे. ‘आयटी पार्क’मधील चार मार्गांबरोबरच देहू-आळंदी हा पाचवा मार्गही निश्चित करण्यात आला आहे. येत्या दिवाळीपर्यंत ‘पीएमपी’च्या ताफ्यात १० डबल डेकर बस तातडीने दाखल करण्याच्या नियोजनाला सुरुवात करण्यात आली आहे.
हिंजवडी, खराडी आणि मगरपट्टा या आयटी क्षेत्रातील वाहतूक कोंडी कर्मचारी आणि कंपन्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सक्षम पर्याय म्हणून ‘डबल डेकर’ बससाठी ‘पीएमपी’ने पुढाकार घेतला. त्यानुसार १६ सप्टेंबर रोजी चेन्नईतील स्विच कंपनीची डबल डेकर बस पुण्यात दाखल झाली. पहिल्या टप्प्यात कात्रज ते हिंजवडी या मार्गावर प्राथमिक चाचणी घेण्यात आली. या मार्गात कुठलेच अडथळे निर्माण झाले नसल्याने ही चाचणी यशस्वी ठरली.
सामान्य ‘पीएमपी’मध्ये ६० प्रवासी घेऊन जाण्याची क्षमता असताना डबल डेकर बसमध्ये ८५ प्रवासी बसतात. या बसमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी सक्षम होऊन वाहतूक कोंडीची समस्या सुटेल, असा अंदाज ‘पीएमपी’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी व्यक्त केला. तसेच, आयटी पार्कमधील चार मार्ग आणि देहू आळंदी या पाचव्या मार्गावर ही डबल डेकर येत्या दिवाळीपासून धावणार असल्याचा अंदाज व्यक्त केला.
कोणते आहे मार्ग?
- हिंजवडी फेज एक ते फेज तीन
- रामवाडी मेट्रो स्थानक ते खराडी आयटी पार्क
- मगरपट्टा सिटी ते कल्याणीनगर मेट्रो स्थानक
- पुणे रेल्वे स्थानक ते लोहगाव विमानतळ (विमानतळमार्गे)
- हिंजवडी – देहू आळंदी (शक्यता)
येत्या दिवाळीपर्यंत पुणेकरांना डबल डेकर बसने प्रवास अनुभवता येण्यासाठी दहा बस तातडीने ‘पीएमपी’च्या ताफ्यात दाखल करण्याचे नियोजन सुरू आहे. नागरिकांची मुख्यत्वे आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. शहराच्या शाश्वत विकासाला हातभार मिळेल. – पंकज देवरे, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी