पुणे : उद्योग विस्तारण्याच्या आणि वर्धिष्णु होण्याच्या अनेक शक्यता असतात. त्यासाठी सुरवातीच्या टप्प्यावर यशस्वी ठरलेले प्रारूप जसेच्या तसे कामी येत नाही. काळानुरूप जे उद्योजक बदल स्वीकारतात, तेच प्रगती करतात, असे प्रतिपादन पर्सिस्टंट सिस्टीम्सचे संस्थापक, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. आनंद देशपांडे यांनी केले.

‘द सिनेट टॉक शो’ अंतर्गत लेखक आणि द सिनेट बिझनेस सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक विक्रांत वर्तक यांनी देशपांडे यांच्याशी संवाद साधला. यावेळी विक्रांत वर्तक लिखित ‘५० डायलेमाज’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी चितळे ग्रुपचे संजय चितळे, इंद्रनील चितळे तसेच शारंगधर फार्मास्युटिकल्सचे डॉ. जयंत अभ्यंकर, बंधन म्युच्युअल फंडचे नीरज कपूर, बीएमडब्ल्यू बव्हेरिया मोटर्सच्या ख्याती निगम आदी उपस्थित होते.

आणखी वाचा-को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती

डॉ. देशपांडे यांनी पर्सिस्टंट सिस्टीम्सच्या उभारणीची, तेव्हाच्या देशातील उद्योगांविषयीच्या मानसिकतेची माहिती यावेळी उपस्थितांना दिली. ते म्हणाले की, प्रगतीचा आलेख स्थिर न राहता उंचावत नेला पाहिजे. नावीन्यपूर्ण योजना राबविण्याची गरज असते. आवश्यक तेव्हा धोरणे बदलली पाहिजेत. सतत नवे बदल स्वीकारत स्वतःला तपासत राहून व्यावसायिक पुनर्विचार करायला हवा. संस्थापक या नात्याने असलेले भावनिक नाते योग्य वेळी बाजूला ठेवून व्यावहारिक तथ्ये समजून घ्यायला हवीत. व्यवसायात मीपणा बाजूला ठेवून आपण हा मंत्र आचरणात आणावा.