पुणे : ‘पहिल्या निवडणुकीत मी समाजवादी काँग्रेसचे काम करत होतो. मात्र, २१ वर्षे पूर्ण असूनही मला मतदान करता आले नाही. मतदार नोंदणी आधीच झाली होती. त्यामुळे मतदान करता आले नाही. मात्र, प्रचारात हिरीरीने भाग घेतला. पक्षाचे विचार पोहोचविण्यासाठी गावागावांत जाऊन कित्येक सभा घेतल्या,’ अशी आठवण ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव सांगतात.

देशातील पहिले मत २५ ऑक्टोबर १९५१ या दिवशी हिमाचल प्रदेशमध्ये मतपेटीत टाकले गेले. सध्या मतदार याद्यांचा घोळ, निवडणूक यंत्रणेवर होत असलेले आरोप अशा अनेक कारणांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. देशाची पहिली निवडणूकही जगभरात चर्चेचा विषय ठरली होती. त्यानिमित्ताने ‘लोकसत्ता’शी बोलताना डॉ. बाबा आढाव यांनी पहिल्या निवडणुकीच्या आठवणींना उजाळा दिला.

ते म्हणाले, ‘लोकशाही अंगीकारलेला देश निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे राबवू शकेल का, याबाबत उत्सुकता होती. स्वातंत्र्यानंतर १९५१ मध्ये पहिल्या निवडणुकीची तयारी सुरू झाली. वयाची २१ वर्षं पूर्ण करणाऱ्या सगळ्या नागरिकांना मताधिकार मिळाला होता. कित्येक देशांत महिला, कामगार मताधिकारापासून वंचित होते. मात्र, आपल्या देशात सर्वांना समान मताधिकार मिळाला होता.’

‘देश स्वतंत्र झाला आणि अनेक प्रश्न समोर होते. सर्वांत महत्त्वाचा प्रश्न देशाच्या जडणघडणीचा होता. त्यामुळे पहिल्या निवडणुकीची उत्सुकता होती. स्वातंत्र्य चळवळीचा उत्साह ओसरलेला नव्हता. सगळीकडे देशप्रेमाने भारलेले वातावरण होते. एका बाजूला काँग्रेस हा सर्वांत मोठा राजकीय पक्ष, तर दुसरीकडे डावे, समाजवादी यांचे आव्हान होते. देशाची वाटचाल कोणत्या दिशेने होणार हा महत्त्वाचा मुद्दा होता. प्रत्येक बाजूचे नेते आपापल्या तर्काने, विचाराने जनमत वळविण्याचा प्रयत्न करताना दिसत होते,’ असेही डॉ. आढाव यांनी सांगितले.

‘काँग्रेसच्या अध:पतनाची मुळे पहिल्या निवडणुकीत’

‘पहिल्या निवडणुकीत पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई यांनी काँग्रेसचे नेतृत्व केले. काँग्रेसमधून समाजवादी बाहेर पडले. त्यानंतर काँग्रेसची अशी कोणतीही विचारधारा राहिली नाही. त्याचे परिणाम आजही दिसतात. काँग्रेसचे अध:पतन झाले आहे. या पक्षाला कोणतीही विचारधारा राहिलेली दिसत नाही. त्याची मुळे ही या पहिल्या निवडणुकीत दिसतात,’ असे डॉ. बाबा आढाव यांनी सांगितले.

‘पहिल्या निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाग घेतला नव्हता. जनता पक्षही नव्हता. त्यामुळे डावे आणि काँग्रेस यांच्यातच ही निवडणूक झाली,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

देशाची पहिली निवडणूक प्रक्रिया कशी होईल, याची सर्वांना उत्सुकता होती. ती चांगल्या पद्धतीने झाली; कारण त्यावेळी आतासारखा मतदान यंत्रणेवर दबाव नव्हता. सध्या सगळीकडे भ्रष्टाचार दिसतो आहे. बिहारच्या निवडणूक प्रक्रियेने विचार आणि जनतेच्या प्रश्नांपेक्षा नेत्याचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे. डॉ. बाबा आढाव,ज्येष्ठ समाजसेवक