आठ हजार शिक्षक बोगस; योग्यता नसताना लाच देऊन उमेदवार पात्र

शिक्षक पात्रता परीक्षा २०१९-२० मधील गैरव्यवहार प्रकरणाचा पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत होता.

योग्यता नसताना लाच देऊन उमेदवार पात्र

पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी-२०२०) गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासात सात हजार ८८० अपात्र उमेदवारांना पात्र ठरविल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली. अपात्र उमेदवारांकडून प्रत्येकी एक लाख ते अडीच लाख रुपये घेण्यात आले असून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले.  याचाच अर्थ शिकविण्याची योग्यता नसलेल्यांना शिक्षक बनविण्याचा प्रकार घडला आहे.

शिक्षक पात्रता परीक्षा २०१९-२० मधील गैरव्यवहार प्रकरणाचा पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत होता. याप्रकरणात शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नोलॉजीस कंपनीचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख, माजी संचालक अश्विनीकुमार तसेच शिक्षण परिषदेचे तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे यांच्यासह ३० ते ३५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी करण्यात आली. शिक्षक पात्रता परीक्षेतील प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येत असून २०१९-२०२० मधील शिक्षक पात्रता परीक्षा राज्यातील १६ हजार ७०५ उमेदवारांनी दिली होती. त्या सर्व उमेदवारांची ओएमआर शीटची तपासणी करण्यात आली. तपासणीत सात हजार ८८० अपात्र उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरविण्यात आल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

झाले काय?

शिक्षक पात्रता गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासात उमेदवारांच्या ‘ओएमआर शीट’ची पडताळणी करण्यात आली, तेव्हा राज्यातील सात हजार ८८० अपात्र उमेदवारांना पात्र ठरविण्यात आल्याचे उघड झाले असून सुपे यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची रोकड, दागिने असा ऐवज जप्त करण्यात आला.

होणार काय? शिक्षक पात्रता गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी असून अपात्र उमेदवारांची यादी शिक्षण विभाग तसेच राज्य शासानाकडे सादर करण्यात येणार असून याप्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.

अपात्र उमेदवारांची गुणवाढ करण्यात आली. अशा उमेदवारांची यादी तयार करण्यात आली आहे. अपात्रांकडून प्रत्येकी एक ते अडीच लाख रुपये घेण्यात आले. अपात्रांना देण्यात आलेल्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे.

– अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Eight thousand teachers bogus candidates are eligible for bribe when they are not qualified akp

Next Story
आरटीईअंतर्गत प्रवेश आता ३० सप्टेंबरपर्यंतच
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी