शनिवार पेठेत पादचारी ज्येष्ठ महिलेकडे बतावणी करुन चोरट्यांनी त्यांच्याकडील ४३ हजारांची सोन्याचे दागिने लांबविण्यात आले.
याबाबत एका ज्येष्ठ महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला शनिवार पेठेतील एका सोसायटीत राहायला आहेत. दुपारी एकच्या सुमारास त्या सोसायटीच्या तळमजल्यावर थांबल्या होत्या. त्या वेळी दोन चोरटे सोसायटीच्या आवारात शिरले. चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेला गाठले. ज्येष्ठ महिलांना बाराशे रुपयांच्या साडीचे वाटप करण्यात येत असल्याचे चोरट्यांनी सांगितले. तुमच्याकडील दागिने काढून ठेवा आणि आमच्या मागोमाग या, असे चोरट्यांनी त्यांना सांगितले. त्यानंतर ज्येष्ठ महिलेने अंगावरील सोन्याचे दागिने पिशवीत ठेवले. चोरट्यांनी हातचलाखीने पिशवीतून ४३ हजारांचे दागिने लांबविले. चोरटे दागिने घेऊन पसार झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार भुजबळ तपास करत आहेत.