पुणे : ‘निसर्गाप्रती असलेल्या वैयक्तिक जबाबदारीचे भान आपण गमावून बसल्यानेच गंभीर समस्या उद्भवत आहेत. पारतंत्र्यात अनेक वर्षे गेल्याने आपली वैचारिक बैठक अजूनही त्या पारतंत्र्यातच आहे. त्यामुळे भारतीय ज्ञान परंपरा अव्हेरून पाश्चात्त्य गोष्टींचे केले जाणारे अंधानुकरण चुकीचे ठरत आहे,’ असे मत राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी रविवारी व्यक्त केले.
मिहाना पब्लिकेशन्सतर्फे ग्रीन फार्मसीचे संस्थापक डॉ. आमोद साने यांचा जीवनप्रवास उलगडणाऱ्या प्रियांका कर्णिकलिखित ‘झाडं लावणारा मुलगा’ या कादंबरीचे प्रकाशन विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी मांढरे बोलत होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि प्रकाशक अमृता कुलकर्णी आदी या वेळी उपस्थित होते.
अभ्यंकर म्हणाले, ‘पर्यावरणाची पूजा बांधणे हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. पर्यावरण संवर्धनाद्वारे मानवी संस्कृती अस्तित्वात राहील, याचे भान आपल्या पूर्वजांपासून आपण बाळगून आहोत. भारताच्या तुलनेत इतर राष्ट्रेच पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात पिळवणूक करणारी असून, तीच राष्ट्रे पर्यावरण संरक्षणासंदर्भात हाकाटी पिटून परिसंवाद घडवून आणत आहेत. तुम्ही पर्यावरणाचा ऱ्हास केल्यास पर्यावरण तुमचा ऱ्हास केल्याशिवाय राहणार नाही.’
‘आयुर्वेदाला पाचव्या वेदाचे मानाचे स्थान लाभलेले आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्याशी संबंधित आजारांचे मूळ आपल्या जीवनशैलीशी निगडित असून, आयुर्वेदात अपेक्षित जीवनशैली अंगीकारल्याशिवाय व्याधीमुक्त समाजनिर्मितीचे ध्येय साध्य करणे दुरापास्त आहे. जीवनातील ताल आणि तोल हरवत चालला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आयुर्वेद हे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असताना आपण भारतीय मात्र आपल्या मूळ ज्ञानस्रोतांपासून दूर जात आहोत,’ असे मत प्रा. जोशी यांनी व्यक्त केले. साने, कर्णिक, कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले. अभय गोखले यांनी सूत्रसंचालन केले.