लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : लष्कराच्या सीमा रस्ते निर्माण संस्थेतील स्वयंपाकी पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत तोतया उमेदवाराला पकडण्यात आले.
या प्रकरणी पुष्पेंद्रकुमार किसनलाल (वय २२, रा. हाथरस, उत्तरप्रदेश) याला अटक करण्यात आली. याबाबत लष्कराच्या सीमा रस्ते निर्माण संस्थेतील (बॉर्डर रोड ऑर्गनायजेशन) सहायक अभियंता एस. एन. वर्मा यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सीमा रस्ते निर्माण संस्थेतील स्वयंपाकी पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत पुष्पेंद्रकुमार यांनी बनावट कागदपत्रे सादर केली. त्याने ओळखपत्र दुसऱ्या व्यक्तीचा छायाचित्र लावून त्याला परीक्षा देण्यास सांगितले. तपासणीत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक राठोड अधिक तपास करत आहेत.