जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करून बांधकाम व्यावसायिकाकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारास स्वारगेट पोलिसांनी अटक केली. बांधकाम व्यावसायिकाने भाडेतत्वावर दिलेला गाळा परत मागितल्यामुळे तोतया पत्रकाराने हा प्रकार केला. विजय महादेव गायकवाड ( रा. भिमाले कॉम्प्लेक्स, मार्केटयार्ड) असे अटक करण्यात आलेल्या तोतया पत्रकाराचे नाव आहे. याबाबत एका बांधकाम व्यावसायिकाने फिर्याद दिली होती.

हेही वाचा- पुणे: एकतर्फी प्रेमातून तरणीचा खून करणाऱ्या आरोपीची आत्महत्या; मुळशीतील घटना

बांधकाम व्यावसायिकाचा गुलटेकडी भागात गाळा आहे. भाडेकरारावर गायकवाडला गाळा वापरण्यास दिला होता. कराराची मुदत संपल्यानंतर गायकवाडला गाळा रिकामा करून देण्यास सांगण्यात आले. भाडेकरारास मुदत वाढ न दिल्यास जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार पोलिसांकडे देतो, अशी धमकी गायकवाडने दिली होती. गायकवाडने बांधकाम व्यावसायिकाकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागितली होती. गायकवाडने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. गुन्हा दाखल करण्याची मागणी त्याने केली होती. त्याने पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढला होता.

दरम्यान, बांधकाम व्यावसायिकाने तक्रार दिली. तपासात गायकवाडने खंडणी मागितल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे तपास करत आहेत.

हेही वाचा- पुणे: कर्वेनगर भागातील बंगल्यात चोरी करणारे गजाआड; चोरटा हॉटेल व्यवसायिक, तर त्याची साथीदार उच्चशिक्षित

गायकवाडच्या घराची झडती; शाळा सोडल्याच्या दाखल्यांच्या प्रती आढळल्या

गायकवाडने एक संघटना सुरू केली होती. संघटनेच्या नावाने त्याने पाक्षिकही प्रकाशित करण्यास सुरुवात केली होती. गायकवाड याची संघटना नोंदणीकृत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या घरात शाळा सोडल्याच्या दाखल्यांच्या प्रती सापडल्या आहेत. त्याने कर्जमंजुरीच्या आमिषाने फसवणूक केल्याचे चौकशीत आढळून आले आहे.