कथित देशविरोधी घोषणा प्रकरणावरून पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य रविंद्रसिंह परदेशी यांनी पोलिसांना पाठविलेल्या पत्रातील चुकीमुळे ते आणखी अडचणीत सापडले आहेत. एकीकडे या मुद्द्यावरून राजकीय संघटना आक्रमक झाल्या असताना दुसरीकडे शिक्षण विभागानेही परदेशी यांच्याकडून लेखी खुलासा मागितला आहे. आंबेडकरी विद्यार्थी संघटनेला पाठिंबा देण्यासाठी महाविद्यालयाच्या आवारात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या काही कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. ‘जितेंद्र आव्हाड चले जाव’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. तसेच काही जणांकडून आव्हाड यांना धक्काबुक्कीही करण्यात आली. पोलिसांनी हस्तक्षेप करीत आव्हाड यांना महाविद्यालयाच्या आवारातून बाहेर काढले. राजकीय संघटना आक्रमक झाल्यामुळे महाविद्यालयाला राजकीय आखाड्याचे स्वरूप आले आहे. दरम्यान या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पोलीस सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
पत्रात चुकी झाल्याचे परदेशी यांनी मान्य केल्यानंतर त्यांच्याविरोधात आंबेडकरी विचारांच्या संघटना आक्रमक झाल्या. भारिप-बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी दुपारी परदेशी यांना त्यांच्या दालनात घेराव घातला. या चुकीबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली.
व्हिडिओ-
या पत्राचे पडसाद बुधवारी विधानभवनामध्येही उमटले. विरोधकांनी प्राचार्यांना निलंबित करण्याची मागणी केली. या प्रकरणी प्राचार्यांची चौकशी करायला हवी, अशी भूमिका राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना मांडली. डाव्या आणि आंबेडकरी विचारांच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी जितेंद्र आव्हाड महाविद्यालयाच्या आवारात आल्यानंतर तणावात काहीशी वाढ झाली. ‘जितेंद्र आव्हाड चले जाव’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. आव्हाड यांना धक्काबुक्कीही करण्यात आली. दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना शांत केले आणि आवारातून बाहेर काढले.