लोणी काळभोरमधील इंधन पुरवठा कंपनीतून बाहेर पडलेल्या टँकरमधील डिझेल, पेट्रोल परस्पर चोरुन त्याच्या विक्रीचा प्रकार गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने नुकताच उघडकीस आणला. पोलिसांनी आणखी १२ टँकर जप्त केले असून इंधनाच्या या काळाबाजार प्रकरणात सखोल तपास करण्यात येत आहे.

टँकरमधील पेट्रोल आणि डिझेल मोजण्यासाटी दोन लोखंडी धातूच्या पट्ट्या (डिपराॅड) जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या धातूच्या पट्ट्या न्याय वैज्ञानिक तपासणीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. लोणी काळभोरमधील इंधन कंपनीतून बाहेर पडणाऱ्या टँकरमधील डिझेल आणि पेट्रोलची परस्पर चोरी करणारी टोळी सक्रीय असून या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. डिझेल आणि पेट्रोल चोरीचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणल्यानंतर पुणे पेट्रोल डिझेल डीलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन समाधान व्यक्त केले आहे. या गुन्ह्याच्या तपासात आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहे.

सामाजिक सुरक्षा विभागाने लोणी काळभोर परिसरातील वळती गावात एका शेतात आडोशाला लावलेल्या टँकरमधून इंधन चोरीचा प्रकार नुकताच उघडकीस आणला होता. या प्रकरणात बालाजी मधुकर बजबळकर (वय ४१ ),दत्तात्रय गजेंद्र बजबळकर (वय ४१, दोघे रा. आनंद नगर, माळवाडी) उत्तम विजय गायकवाड (वय ३१), अजिंक्य मारुती शिरसाठ (वय २६ तिघे रा. लोणी काळभोर), साहिल दिलीप तुपे (वय २२) यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या वेळी एक टँकर जप्त करण्यात आला होता. तपासात आणखी १२ टँकर जप्त करण्यात आले आहेत. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक तपास करत आहेत.