करोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात गणेशोत्सवादरम्यान जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. पुणे शहरामध्ये १० सप्टेंबर ते १९ सप्टेंबरपर्यंत १४४ कलम लावण्यात आलं आहे. पुणे शहर पोलीस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत. करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून पोलीस आयुक्तालय क्षेत्रात जमावबंदी, प्रार्थनास्थळंबंद ठेवण्यासंबंधी तसेंच संचारास मनाई करणारे आदेश लागू केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये रस्त्यात, सार्वजनिक जागेत, सार्वजनिक गणेश मंडळाच्या समोर ज्वालाग्रही (रॉकेल, डिझेल, पेट्रोल, गॅस इ.) पदार्थाच्या सहाय्याने आगीचा लोळ निर्माण करण्यास किंवा हवेत सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश १० सप्टेंबरपासून ते १९ सप्टेंबरपर्यंत लागू असणार आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल अशा इशारा पुणे शहर पोलीस सह आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी दिला आहे.

मानाच्या गणपतींची प्रतिष्ठापना यंदाही साधेपणाने

मानाच्या गणेश मंडळांसह सर्व सार्वजनिक मंडळांच्या वतीने यंदाही उत्सव साधेपणाने साजरा होणार आहे. मानाच्या पाच गणपतींसह प्रमुख गणेश मंडळांच्या गणेशाची प्राणप्रतिष्ठापना शुक्रवारी (१० सप्टेंबर) दुपापर्यंत होणार आहे. प्रतिष्ठापनेआधी मिरवणूक निघणार नसली, तरी या गणपतींचे दर्शन ऑनलाइन माध्यमातून घेता येणार आहे. मानाचा पहिला कसबा गणपती, दुसरा तांबडी जोगेश्वरी, तिसरा गुरुजी तालीम यांच्या फेसबुक पेजवर, तर तुळशीबाग मंडळाच्या यूटय़ूब पेजवर प्रतिष्ठापनेचा सोहळा आणि ‘श्रीं’च्या दर्शनाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे.

कसबा गणपती

मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठापना सकाळी ११ वाजून ३८ मिनिटांच्या मुहूर्तावर खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते होणार आहे. त्याआधी मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत परंपरेप्रमाणे ‘श्रीं’ची मूर्ती पालखीतून उत्सव मांडवात आणण्यात येईल.

तांबडी जोगेश्वरी

मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ‘श्रीं’च्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सकाळी साडेअकरा वाजता वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी यांच्या हस्ते सनई चौघडय़ांच्या सुरावटीत होणार आहे.

गुरुजी तालीम मंडळ

मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम मंडळाच्या गणरायाची प्राणप्रतिष्ठापना श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाचे उत्सवप्रमुख पुनीत बालन यांच्या हस्ते दुपारी एक वाजता के ली जाणार आहे. उत्सवमूर्तीचे हे सुवर्णमहोत्सवी (५० वे ) वर्ष आहे.

तुळशीबाग मंडळ

मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ‘श्रीं’च्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना उद्योजक युवराज ढमाले यांच्या हस्ते दुपारी साडेबारा वाजता होणार आहे. चिंतामणी जोशी पौरोहित्य करणार आहेत. धार्मिक विधी या वेळी होणार आहेत.

केसरी गणेशोत्सव

मानाचा पाचवा के सरीवाडा गणेशोत्सव मंडळाच्या ‘श्रीं’ची मूर्ती परंपरेनुसार पालखीतून के सरीवाडय़ात आणली जाईल. ‘के सरी’चे विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना होणार आहे. सनई-चौघडय़ाचा मंगलमयी स्वरनाद आणि धार्मिक विधी अशा थाटात श्री विराजमान होणार आहेत.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने सकाळी दहा वाजून २३ मिनिटांनी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. वेदमूर्ती नटराज शास्त्री आणि मिलिंद राहुरकर हे पौरोहित्य करणार आहेत. प्राणप्रतिष्ठापना सोहळा, ‘श्रीं’चे दर्शन आणि ऋषिपंचमीनिमित्त होणारा अथर्वशीर्ष पठण सोहळा ऑनलाइन पद्धतीने पाहता येईल.

अखिल मंडई मंडळ

अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाची प्रतिष्ठापना इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र विभागाचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे आणि मीना भोंडवे यांच्या हस्ते दुपारी बारा वाजता मंदिरातच होणार आहे. परंपरेनुसार सनई-चौघडा वादन होणार आहे. अविनाश कु लकर्णी गुरुजी पौरोहित्य करणार आहेत.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची प्रतिष्ठापना गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या हस्ते दुपारी साडेबारा वाजता होणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganeshotsav 144 article in pune city svk 88 sgy