लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : पुणे जिल्ह्यात भरदिवसा घरफोडी करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखा, तसेच नारायणगाव पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून १९ तोळे सोन्याचे दागिने, दुचाकी, मोबाइल संच असा १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गणेश गोवर्धन काळे (वय २४), मिलिंद इश्वर भोसले (वय २५) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. आरोपींनी त्यांच्यबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक राजेंद्र गवळी यावेळी उपस्थित होते.

आणखी वाचा-भोर तालुक्यात जादूटोण्याच्या संशयातून देवऋषीचा खून, मृतदेह नदीपात्रात टाकून अपघाताचा बनाव

आरोपी मिलिंद भोसलेविरुद्ध नगर, बीड, पुणे ग्रामीण भागात घरफोडी, जबरी चोरीचे १६ गुन्हे दाखल आहेत. जुलै २०२३ मध्ये शिरूर परिसरात पिस्तुलातून गोळीबार करून चोरी केली होती. मे २०२४ मध्ये तो कारागृहातून जामीन मिळवून बाहेर पडला. जिल्ह्यातील विविध भागात भरदिवसा घरफोडीचे प्रकार वाढले होते. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत होता. सीसीटीव्ही चित्रीकरण उपलब्ध नसल्याने पोलिसांना तपासात अडचण आली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी दीपक साबळे, संदीप वारे, अक्षय नवले कल्याण-नगर महामार्गावर गस्त घालत होते. त्यावेळी आरोपी दुचाकीवरुन निघाल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने महामार्गावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. नगर औद्योगिक वसाहतीपर्यंत पोलिसंनी चोरट्यांचा माग काढला. त्यानंतर पोलिसांनी काळे आणि भोसले यांना सापळा लावून पकडले. आरोपींनी अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने घरफोडी केल्याचे तपासात उघडकीस आले.

आणखी वाचा-ज्येष्ठाला मोहजालात अडकावून खंडणी प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक बडतर्फ

पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक निरीक्षक महादेव शेलार, राहुल गावडे, कुलदीप संकपाळ, उपनिरीक्षक अभिजीत सावंत, उपनिरीक्षक जगदीश पाटील, दीपक साबळे, सचिन घाडगे, संदीप वारे, अक्षय नवले, जनार्दन शेळके, अतुल डेरे, मंगेश थिगळे यांनी ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gang of burglars in broad daylight in pune district was arrested pune print news rbk 25 mrj