पुणे परिसरातील वाहन उद्योगांसाठी वाहतुकीचा नवा मार्ग
पुणे : पुणे विभागातील आणि विशेषत: पिंपरी-चिंचवड आणि चाकण पट्टय़ातील वाहन क्षेत्रातील उद्योगांना त्यांची उत्पादने रेल्वेने दक्षिणेकडील भागांत पाठविण्यासाठी वाहतुकीचा नवा मार्ग खुला झाला आहे. त्यानुसार पुणे रेल्वेने प्रथमच १२५ नव्या मोटारी असलेली मालगाडी चिंचवड येथून दक्षिण भारतात रवाना केली. पुढील काळातही ही वाहतूक सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पुणे रेल्वेकडून सांगण्यात आले.
पुणे रेल्वेकडून देशाच्या विविध भागामध्ये विविध प्रकारच्या वस्तूंची सातत्याने वाहतूक केली जाते. त्यात प्रामुख्याने साखर आणि इंधनाचा समावेश असतो. करोना संकटाच्या काळात देशाच्या विविध भागांत पुणे विभागातून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यात आली. याही काळात बारामती भागातून साखर, तर पुणे जिल्ह्यातून तेल उत्पादने देशाच्या विविध भागांत मोठय़ा प्रमाणावर पाठविण्यात आली. पुणे विभागातून यापूर्वी नव्या मोटारींची वाहतूक करण्यात आली आहे. मात्र, या मोटारी रेल्वेमार्गे केवळ उत्तर भारतात पाठविण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता प्रथमच नव्या मोटारींच्या उत्पादनाची वाहतूक रेल्वेमार्फत दक्षिण भारतात सुरू करण्यात आली आहे.
जलद वाहतूक, वाजवी दर आणि सुरक्षितता लक्षात घेऊन भारतीय वाहतूक महामंडळाने रेल्वेच्या माध्यमातून उत्पादने देशभर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. पिंपरी-चिंचवड आणि चाकण परिसरातील उद्योगांमध्ये उत्पादित झालेल्या मोटारी नुकत्याच चिंचवड येथून रेल्वेच्या माध्यमातून दक्षिणेतील अर्नाकुलम येथे पाठविण्यात आल्या. या निमित्ताने रेल्वेमार्फत मोटार वाहतुकीची दक्षिणेतील ही पहिलीच फेरी ठरली. पुणे रेल्वेच्या व्यवस्थापक रेणू शर्मा, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांच्या पुढाकाराने रेल्वेने वाहतुकीचा हा नवा मार्ग सुरू केला आहे. पुढील काळातही मागणीनुसार ही वाहतूक करण्यात येणार असून, त्यामुळे उद्योगांनाही पर्याय खुला झाला असल्याचे पुणे रेल्वेकडून सांगण्यात आले.