गिर्यारोहण म्हणजेच पर्यटन असे नवे समीकरण राज्य शासनाने केले आहे.  गिर्यारोहणासारख्या साहसी खेळाचा शासनाने साहसी पर्यटनामध्ये समावेश करून गिर्यारोहकांच्या साहसाची थट्टा केली आहे. करोनामुळे सर्वच गोष्टी थांबलेल्या साहसी खेळाला पर्यटनामध्ये समाविष्ट करण्याची शासनाकडून एवढी घाई का केली जात आहे, असा सवाल अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाकडून साहसी पर्यटन उपक्रम नियमावली संदर्भात प्रस्तावित शासकीय अध्यादेशाचा मसुदा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करताना सर्वासाठी सूचना आणि हरकती नोंदविण्यासाठी खुला केला आहे.

या मसुद्यानुसार गिर्यारोहणासारखा सर्वागीण कस पाहणारा, माणसाची विजिगीषु वृत्ती जपणारा आणि संपूर्ण जगात मान्यताप्राप्त असा साहसी खेळ महाराष्ट्र राज्यात मात्र पर्यटन म्हणून गणला जाणार आहे. साहसी खेळ पर्यटन विभागाच्या अधिपत्याखाली येणार आहे. त्याला झिरपे यांनी आक्षेप घेतला आहे.

झिरपे म्हणाले,‘गिर्यारोहण व त्याच्या मोहिमा म्हणजे कठोर प्रशिक्षण, वर्षांनुवर्षांचा अनुभव, काटेकोर नियोजन, कष्टप्रद चढाई, प्रतिकूलतेवर मात करत केलेले साहस, निसर्गाचा आदर आणि गावकऱ्यांशी जपलेली नाती असे काय काय असते, हे सच्च्या डोंगर भटाक्यांनाच माहीत! अशा या महत्त्वाकांक्षी खेळाचे पर्यटकीकरण केले, तर  शेर्पा तेनसिंग नोर्गे, सर एडमंड हिलरी आणि सुरेंद्र चव्हाण यासारखे गिर्यारोहक पर्यटक होते असे म्हणावे लागेल. कोणतेही प्रशिक्षण न घेता समाजमाध्यमांवरील ‘स्टेटस’साठी पैसे देऊन केलेली एखादी कृती आणि जीव ओतून केलेली एखादी खडतर साहसी कामगिरी हे दोन्ही सारखेच म्हणावे लागेल. गड-दुर्गावर प्रेम असणारी, निसर्गाविषयी आदर असणारी, स्वत:च्या खर्चाने वृक्षारोपण, स्वछता मोहिमा राबवणारी मंडळी आणि आपल्या आनंदासाठी निसर्गात कचरा करणारी, बिसलेरीच्या बाटल्या फेकणारी, चारचाकी मधून डोंगरांवर जाऊन पाटर्य़ा करणारी मंडळी दोघेही समानच म्हणावे लागतील.’

हे टाळण्यासाठी हरकती पाठवाव्यात

गिर्यारोहण या जगमान्य साहसी खेळाला आपल्या राज्यातदेखील पर्यटन विभागापासून वेगळे करून साहसी खेळ म्हणूनच क्रीडा विभागात गणले जावे, यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या तीनही संकेतस्थळावर आपापल्या शब्दात हरकती पाठवाव्यात. त्याची प्रत महासंघाच्या giryarohanmahasangh@gmail.com या इमेल वर पाठवावी. जेणेकरून त्याचा पाठपुरावा महासंघातर्फे करता येईल.

diot@maharashtratourism.gov.in

asdtourism.est_mh@gov.in

http://www.maharashtratourism.gov.in

पुणे विभागात पाचगणी येथे साहसी पर्यटनाला वाव आहे. मात्र, धोरण निश्चित नसल्याने चालना मिळत नाही. तसेच लोणावळा येथील कामशेत येथे पॅराग्लायडिंग उपलब्ध होऊ शकेल. धोरण निश्चित होऊन प्रत्यक्ष अंमलबाजवणीला सुरुवात झाल्यानंतर साहसी पर्यटनामध्ये सुसूत्रता येईल.

– सुप्रिया करमरकर-दातार, उपसंचालक, पर्यटन संचालनालय, पुणे विभाग