संत्रिका विभागाची स्थापना कधी आणि कोणी केली?

– विद्यावाचस्पती विनायक विश्वनाथ पेंडसे तथा आप्पा पेंडसे यांनी पुण्यात ज्ञान प्रबोधिनीची स्थापना १९६२ मध्ये केली. स्थापनेनंतर २२ जुलै १९७५ या दिवशी संस्कृत संस्कृति संशोधिका म्हणजेच संत्रिका या नावाने या नव्या विभागाची स्थापना झाली.

संत्रिका विभागाची स्थापना करण्यामागे उद्देश काय होता?

– पुण्यातील ज्येष्ठ संस्कृत विद्वानांच्या उपस्थितीत, प्रसिद्धी आणि संशोधन अशा दोन्ही स्तरांवर संस्कृत भाषा आणि भारतीय संस्कृतीचा विकास व्हावा, त्याद्वारे समाजात संवादसेतू बांधले जाऊन सामाजिक एकात्मता साधता यावी, यासाठी या विभागाची निर्मिती झाली. या नव्याने उदयाला आलेल्या विभागाचे संगोपन आणि वृद्धीचे काम संस्कृतचे गाढे अभ्यासक प्रा. कृष्ण श्री. अर्जुनवाडकर यांच्याकडे सोपविण्यात आले होते. तीन ‘सं’ म्हणून संत्रिका. याचा अर्थ संस्कृत भाषा व भारतीय संस्कृतीच्या विविध आयामांचा अभ्यास आणि संशोधन करणे.

संत्रिकेमार्फत कोणत्या उपक्रमांपासून कार्याला सुरुवात झाली?

– प्रा. अर्जुनवाडकर यांनी संस्कृतमधील शुभेच्छापत्र, सौर कालदर्शिका, बंगाली भाषा वर्ग, पारशी धर्मग्रंथ ‘अवेस्ता’वरील श्री. म. अ. मेहेंदळे यांची व्याख्याने, संस्कृत साहित्याचे वाचन आदी उपक्रमांतून सुरुवातीला केलेल्या कामांतून संत्रिका विभागाचे काम मूळ धरू लागले. प्रा. यशवंतराव लेले, प्रा. विश्वनाथ गुर्जर यांनी हे कार्य बहुआयामी केले.

त्यांनी विविधांगी कामांच्या कल्पना फुलवल्या. राष्ट्रीय एकात्मता विषयावरील मुक्त चर्चेस खुला असलेला ‘जनतंत्र उद्बोधन मंच’ अथवा प्रबोधिनीतील कार्यकर्त्यांनी आंतरविद्याशाखीय अभ्यास समजून घ्यावा यासाठी ‘मासिक वैचारिक योजना’ अशा उपक्रमांमुळे विविध क्षेत्रांतील व विविध विचारसरणीचे, रवी परांजपे, राजीव साने, सय्यद भाई, असगरअली इंजिनीअर यांसारखे ज्येष्ठ सदस्य संत्रिकेच्या मंचावर आपले विचार खुलेपणाने मांडून गेले.

अलीकडच्या काळात अन्य धर्मीय समाजाला समजून घेण्यासाठी कुरआन अभ्यास, मुस्लिम महिलांना शिक्षणामुळे मिळणारी प्रेरणा आणि संधी या विषयावरील मुलाखती असेही उपक्रम झाले. या प्रकारच्या वैचारिक घुसळणीतून सामाजिक शास्त्र अध्ययन केंद्राच्या माध्यमातून आंतरविद्याशाखीय काम आता स्वतंत्रपणे सुरू झाले आहे.

संत्रिकेमार्फत काय कार्य चालते?

– संत्रिका विभागाचा एक उपक्रम म्हणजे पौरोहित्य. महाराष्ट्रातील धर्मशास्त्राचे विद्वान अभ्यासक पं. नारायणशास्त्री मराठे, तर्कसांख्यतीर्थ पं. रघुनाथशास्त्री कोकजे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आदींनी १९३४ मध्ये सुरू केलेल्या तत्त्वनिष्ठ परिवर्तनवादी परिषदेचा, धार्मिक विधीतील कालानुकूल परिवर्तनाचा धर्म निर्णय मंडळाचा वारसा संत्रिकेने नुसताच पुढे नेला असे नाही, तर त्यात कालोचित मूल्यांची भर घालून तो अधिक समयोचित केला. संस्कारांच्या माध्यमातून विविध समाजांत पोहोचताना बुरूड समाजातील सामूहिक विवाह, अंध-अपंग वधू-वर विवाह, परीट समाजातील महिलांसाठी कार्यक्रम, सोमवंशीय क्षत्रिय समाजातील सामूहिक उपनयन संस्कार अशा सर्व समाजगटांतील सामूहिक आणि कौटुंबिक संस्कारांत संत्रिकेचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे.

देश-विदेशात आता ज्ञानप्रबोधिनीची संस्कार पद्धती पोहोचली आहे. परदेशस्थ भारतीय दूरस्थ पद्धतीने या संस्कारसेवांचा लाभ घेतात. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विविध समाजगटांतील महिला व पुरुषांना स्वयंपौरोहित्य करता यावे, यासाठी प्रशिक्षण दिले जाते. मात्र, याशिवाय विभागातून गरूडपुराणातील आयुर्वेद, संस्कृत साहित्याचा इतिहास, धर्मविधींच्या अंतरंगात अशा पुस्तकांचे प्रकाशनही झाले आहे. या शिवाय वेद, पुराणे, कोश, विविध भाषा आणि लिपींमधील रामायणे असे सात हजारांपेक्षा अधिक पुस्तके असलेले समृद्ध ग्रंथालय संत्रिकेत आहे.

संत्रिका स्थापनेमागचा उद्देश सफल झाला असे वाटते का?

– होय, समाजात संवादसेतू बांधले जावेत यासाठी काम सुरू असते. ‘श्राद्ध’ व ‘भारतीय संस्कृतीमधील कासव’ या विषयावर गेल्या काही वर्षांत प्रबंध झाले. त्याचप्रमाणे मातृभूमिपूजन, अक्षरराम, विहीर लोकार्पणविधी यातून विविध स्तरापर्यंत पोहोचता आले आहे. तर अनेक संस्कार, शांती यातून आम्ही देशभर जाऊ शकलो. प्रशिक्षित पुरोहित संच यासाठी कार्यरत आहे. अर्थात तरीही अजून बरेच पुढे जायचे आहे.

संत्रिकेच्या भविष्यातील योजना काय आहेत?

– संस्कृत व संस्कृति, विशेष करून लोकसंस्कृतींचा अभ्यास, तसेच भारतीय संस्कृतीच्या विविध आयामांचा अभ्यास संशोधन विभागात व्हावा, यासाठी प्रयत्नशील आहोत. तसेच प्रबोधिनीच्या संस्कार पद्धतीचा महाराष्ट्रभर व भारतभर प्रचार व प्रसार व्हावा यासाठी विविध भारतीय भाषांत आमच्या पोथ्या आम्हाला उपलब्ध करून द्यायच्या आहेत. तंत्रज्ञानाचा उचित उपयोग आता अधिक केला जात आहे.

shriram.oak@expressindia.com