लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: शहरातील निवासी मिळकतीमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असलेले अनधिकृत हॉटेल, खानावळी, बारवर महापालिकेकडून कारवाई केली जाणार आहे. त्याची तक्रार नागरिकांना करता येणार असून, त्यासाठी महापालिका प्रशासनाकडून स्वतंत्र दूरध्वनी क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. तसेच तक्रारींची दखल घेण्यासाठी आणि त्या संदर्भात कारवाई करण्यासाठी महापालिका भवनात ‘वॉर रूम’ची स्थापना करण्यात आली आहे.
महापालिका हद्दीत नव्याने अस्तित्वात येणाऱ्या निवासी, बिगरनिवासी, मोकळ्या जागा इत्यादी मिळकती, तसेच वापरात बदल होणाऱ्या मिळकतींची महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदी नुसार त्या त्या वर्षाच्या प्रचलित दरसूचीनुसार आकारणी करून मिळकतीची वार्षिक करपात्र रक्कम निश्चित करण्यात येते.
आणखी वाचा-पुणे : पोलीस कर्मचाऱ्याविरोधात बलात्कार आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
शहरामध्ये निवासी मिळकतीमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत हॉटेल व्यवसाय सुरू आहेत. निवासी मिळकतीमध्ये बांधकाम विभागाची कोणतीही परवानगी न घेता, वापरात बदल करून, अनधिकृत हॉटेल, उपाहारगृहे, मद्यालय, खानावळ असे व्यवसाय रात्री उशिरा किंवा पहाटेपर्यंत सुरू असतात. काही ठिकाणी कर्णकर्कश आवाजात गाणी लावली जात असल्याने निवासी भागातील शांतता भंग होत आहे. या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांकडून वाहने रस्त्यावर लावली जात असल्याने वाहतुकीचा प्रश्नही निर्माण होत आहे. या संदर्भात महापालिका प्रशासनाकडे सातत्याने तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून वॉर रूम स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अनधिकृत हॉटेल, पब, रेस्टॉरंटमध्ये अनधिकृतपणे सर्रास सुरु असल्याने या सर्व गोष्टीना चाप बसावा, तसेच निवासी मिळकती बिगरनिवासी व्यवसाय करून महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कर आकारणी आणि करसंकलन कार्यालयांकडून वॉर रूम तयार करण्यात आली आहे. यामध्ये गृह निर्माण संकुलांमध्ये निवासी सदनिकेव्यतिरिक्त कार्यालयीन वापर, व्यावसायिक वापर सुरु असल्यास किंवा एखाद्या मिळकतीची करआकारणी केली नसल्यास, अशा मिळकतींची माहिती ८३०८०५९९९९ या क्रमांकावर कळविण्याचे आवाहन आयुक्त विक्रम कुमार यांनी केले आहे. मिळकतींचा पत्ता आणि लोकेशन या क्रमांकावर कळविल्यानंतर त्या मिळकतीवर कारवाई करण्यात येणार आहे.