Heart Disease Risk Factors High Blood Pressure Obesity Diabetes: पुणे : हृदयाच्या आरोग्यासाठी चयापचयाच्या समस्यांमुळे उद्भवणाऱ्या आजारांपासून दूर राहावे. उच्च रक्तदाब, स्थूलता आणि मधुमेह यांसारख्या सहव्याधी असलेल्या त्रिकूटापासन व्यक्तींना हृदयविकाराचा सर्वाधिक धोका असतो. त्यामुळे जीवनशैलीतील चांगले बदल हे हृदयासाठी लाभकारक ठरतात, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.

जागतिक हृदय दिन २९ सप्टेंबरला साजरा होत असून, या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी हृदयाच्या आरोग्याची काळजी घेण्याकडे लक्ष वेधले आहे. याबाबत नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटरमधील हृदयविकारतज्ज्ञ डॉ. सुजित सवदतकर म्हणाले की, भारतीय लोकसंख्येमध्ये सहव्याधींचे वाढते प्रमाण व रक्तवाहिन्यांचा आजार हे चिंतेचे कारण आहे.

चयापचयाच्या विकारांमुळे रक्तातील साखरेचे नियंत्रण, कॉलेस्ट्रॉल नियंत्रण या शरीराच्या महत्त्वाच्या कार्यावर विपरीत परिणाम होतो. त्यातून रक्तवाहिन्यांच्या आजाराचा धोका वाढतो. हृदयाच्या आरोग्यासाठी उच्च रक्तदाब, स्थूलता, मधुमेह यांपासून दूर राहावे. यातील प्रत्येक स्थिती हृदयावरील ताण वाढवू शकते आणि एकत्रितपणे हे आजार आणखी हानिकारक ठरू शकतात.

विश्वराज हॉस्पिटलमधील (लोणी) हृदयरोगशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सूरज इंगोले म्हणाले की, रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार हे आजच्या काळातील हृदय आरोग्याची सर्वांत मोठी समस्या आहे. रक्तवाहिन्यांसंबंधी आजार घेऊन येणाऱ्या रुग्णांमध्ये तरुणांचा वाढता आकडा हा चिंताजनक आहे. हृदयरोग अनेक कारणांमुळे होऊ शकतो. त्यातील जोखीमकारक घटक म्हणजे अनुवंशिकता, बैठी जीवनशैली, ताण, धूम्रपानासारख्या सवयी, अयोग्य आहार आणि उच्च रक्तदाब, मधुमेह व स्थूलता यांसारख्या सहव्याधींचा समावेश आहे. छातीत दुखणे, थकवा, दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. चाळीशीतील लोकांनी टू-डी इको, लिपिड प्रोफाईल व स्ट्रेस टेस्टसारख्या निदान चाचण्या डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित कराव्यात.

लहानपणापासूनच लावलेल्या चांगल्या जीवनशैलीच्या सवयी हा हृदयाच्या आरोग्याचा पाया ठरू शकतात. लहान मुलांना स्क्रीन टाईमपेक्षा बाहेर खेळण्यास प्रोत्साहित करणे, आहाराच्या चांगल्या सवयी लावणे यामुळे पुढे जाऊन सहव्याधी व हृदयासंबंधी जोखीम कमी होऊ शकते. जीवनशैली ही आपल्या हातात असते. आपण हालचाल करीत राहिलो, चांगला आहार घेतला तर नक्कीच तंदुरुस्त राहू शकतो, असेही डॉ. इंगोले यांनी नमूद केले.

काळजी काय घ्यावी…

  • नियमित व्यायाम
  • समतोल आहार
  • ताणतणाव व्यवस्थापन
  • धूम्रपान व तंबाखूसेवन टाळणे
  • नियमित तपासण्या